मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट, दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार; आणखी वैशिष्ट्ये काय?

| Updated on: Jan 17, 2022 | 4:02 PM

माहुल येथे जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे.

मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट, दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार; आणखी वैशिष्ट्ये काय?
aaditya thackeray
Follow us on

मुंबई: माहुल येथे जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यानंतर निर्माण झालेल्या या ऑक्सिजन प्लांटचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत मुंबई महानगरपालिका सुसज्ज झाली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याने माहुल परिसरात भारत पेट्रोलियम कंपनी आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ( व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) करण्यात आले. आजमितीला मुंबईत कार्यान्वित होणारे हे दोन ऑक्सिजन प्लांट म्हणजे कोणत्याही संकटाविरोधात लढण्याच्या मुंबई स्पिरीट चं अनोखं उदाहरण आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग द्यायला हवा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

देशातील पहिली महापालिका

कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातूनही वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागले. इतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण व सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. आज या प्रकल्पांच्या लोकार्पणातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून अशाप्रकारचे प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोंद झाली आहे, असं आदित्य म्हणाले.

कोविड विषाणूचे डेल्टा व ओमायक्रॉन हे दोन्ही उपप्रकार अद्याप फैलावत असून सर्वांनी मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर यासारख्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही करतानाच दोन्ही प्रकल्पांची वेगाने उभारणी केल्याबद्दल त्यांनी महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व बीपीसीएल यांचेही कौतुक केले.

वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी पूर्ण होणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आधीच राज्य सरकारने ‘ मिशन ऑक्सिजन ‘ ची घोषणा केली होती. त्याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील मोठ्या कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने या जंबो ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली असून या प्लांट मधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती केली जाणार आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार सर्वतोपरी सज्ज आहे. माहुल येथील जंबो प्लांटमुळे मुंबई उपनगर आणि आसपासच्या मेट्रो रिजन मधील वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी पूर्ण होऊ शकेल. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत उभारण्यात आलेल्या प्लांट साठी भारत पेट्रोलियम आणि मुंबई महानगर पालिकेचे आभार मानतोस, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

माहुल जम्बो ऑक्सिजन प्लांटची वैशिष्टे

माहुल, चेंबूर येथे पालिकेच्या जागेवर प्लांट उभारण्यात आला आहे.

व्ही पी एस ए टेक्नॉलॉजी द्वारा ऑक्सिजन निर्मिती होणार.

भारत पेट्रोलियमने एक आणि पालिकेने दोन ऑक्सिजन कॉम्प्रेसर यंत्रणा बसवली आहे.

प्रकल्पाचा खर्च अंदाजे 15 कोटी रुपये आहे.

14 लिटरचा एक याप्रमाणे तासाला सुमारे 50 सिलेंडरची निर्मिती होणार.

दिवसाला सुमारे 1500 सिलेंडर चा पुरवठा केला जाणार.

पूर्व उपनगर आणि मेट्रो रिजनमधील रुग्णालयांना आणि कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार.

 

संबंधित बातम्या:

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुणे जिल्ह्यात कोरोना रुगणसंख्या वाढली

मेट्रोच्या ट्रायलसाठी शरद पवार कशासाठी? मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणणार, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा इशारा

एनडी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणाले, आमच्या बहिणीचे काही चालले नाही, तिथे आमच्या व्हिपचे काय?; काय आहे किस्सा?