‘ते’ विधान झोंबलं… आदित्य ठाकरे आणि संजय शिरसाट यांच्यात जुंपली; आदित्य म्हणाले, सडक्या विचारांचे…
नाणारच्या मुद्द्यावरून काही लोकांनी टीका केली आहे. कोकणातील लोकांनी नाणारला विरोध केला आहे. स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही विरोध केला.
मुंबई | 30 जुलै 2023 : ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक भयंकर विधान केलं होतं. प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहूनच आदित्य ठाकरे यांनी त्यांना खासदारकी दिली होती, असं चंद्रकांत खैरेच म्हणाले होते, असं धक्कादायक विधान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. या विधानावरून आदित्य ठाकरे आणि संजय शिरसाट यांच्याच चांगलीच जुंपली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांच्यावर जोरदार टीका करताना सडक्या विचारांचे लोकं अजूनही राजकारणात कसे? असा सवाल केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी या मतदारसंघाला भेट दिली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली. काही लोकांना भाव न देणं हेच बरं राहील. त्यांना दीड वर्षापासून तिकडेही भाव मिळत नाही. त्यांना किंमत मिळत नाही. त्यांची लायकी त्यांना कळली आहे. तिसऱ्या विस्तारातही त्यांना स्थान मिळत नाही. ही सडक्या विचारांची लोक आहेत. ती राजकारणात टिकली कशी याचं आश्चर्य वाटतं. दु:खही होतं. त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांना मोठं करण्यात अर्थ नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
शेलारांवर टीका
यावेळी त्यांनी नाणारच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली. नाणारच्या मुद्द्यावरून काही लोकांनी टीका केली आहे. कोकणातील लोकांनी नाणारला विरोध केला आहे. स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही विरोध केला. आम्ही स्थानिकांच्या बाजूने आहोत. त्यांना कोकणवासी देशद्रोही वाटत असेल तर वाटू द्या. ती त्यांची विचारधारा आहे. हे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका त्यांनी शेलार यांचं नाव न घेता केली.
त्याला कोण जबाबदार?
यावेळी मुंबईतील रस्त्यांच्या कामावरूनही सरकारवर टीका केली. रस्त्याची कामे अर्धवट आहेत. मेट्रोची कामं बरोबर नाहीत. मेट्रोचे बॅरिकेड उघडे आहे. मेट्रोचा चिखल रस्त्यावर आहे. गड्डे उघडेच आहेत. त्यात कोम पडलं तर त्याला कोण जबाबदार असेल?, असा सवाल त्यांनी केला.
तर तुमचा भ्रष्टाचार काढू
यावेळी त्यांनी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका केली. लोढा बिल्डरसाठी बोलतात की देशासाठी हा मोठा प्रश्न आहे. पालकमंत्र्यांचं कार्यालय महापालिकेत सुरू झालं आहे. अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही चुका केल्या आहेत, त्या आम्ही पाहत आहोत. तुम्हाला किंमत चुकवावी लागेल. आमचं सरकार आल्यावर तुमचा भ्रष्टाचार काढू, असा इशाराच त्यांनी दिला.