‘आम्हाला शेंबडी पोरं, तुम्हाला एचएमव्ही पत्रकार म्हणतात, पण…’, आदित्य ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचा समाचार
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरासमोर नोकरीसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं असं म्हणत हिणवलं होतं. पण त्यांच्या याच टीकेचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. “आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला कुणी शेंबडी पोरं म्हणतात, तुम्हाला एचएमव्ही पत्रकार म्हटलं जातं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“कुठेही माफी न मागता, कारभार जसा चालतोय तसा न चालवता मजामस्ती चाललेली आहे. बीएमसीमध्ये टाईमपास टेंडर चाललं आहे. सत्तेची एक वेगळी मस्ती दाखवली जातेय”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
“कृषीमंत्री महिलांना शिवीगाळ करतात. कुणीही पश्चात्ताप व्यक्त करत नाही. माफी मागत नाही. मुख्यमंत्र्यांकडून कारवाई केली जात नाही, कान टोचले जात नाहीत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“त्यांचे टीईटी घोटाळा असेल, ओला दुष्काळावरील विधान असेल, अनेक गोष्टी आहेत, शेतकरी मित्रांना कुठेही मदत पोहोचलेली नाही. नुसत्या घोषणेवर घोषणा केल्या जात आहेत. शेतकऱ्यांसाठी खरी मदत अजून पोहोचलेली नाही”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
“कायदा-सुव्यस्थेच्या चिंधळ्या उडत आहेत दादर-माहिमध्ये आपण बसलोय. इथल्या स्थानिक गद्दारांनी तर पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला. त्यांच्यावर आर्म्स अॅक्टची केस दाखल झालेली आहे. पण कुठेही अटक वगैरे झालेली नाही”, अशी टीका त्यांनी केली.
“हे सगळं होत असताना वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो. वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्याचं आता दु:ख नाही. पण जो प्रकल्प आपल्याकडे येत होता तो ऐनवेळेला दुसऱ्या राज्यात जातो, कमी विकसित एमआयडीसीत जातो तेव्हा त्याला सुरु व्हायला सहा-सात वर्ष लागतो”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“याच प्रकल्पाबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ४ लाख कोटी घेऊन वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प येणार असं म्हटलं होतं. एमआयडीसीच्या जर्नलमध्ये 1 लाख कोटी घेऊन येणार असं आलं होतं. उपमुख्यमंत्र्यांनीदेखील ट्विट केलेलं, बैठका घेतलेलं. हे सगळं झालं असलं तरी जेव्हा आम्ही हा विषय समोर आणला तेव्हा हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार काळातच गुजरातला गेला असा आरोप करण्यात आला”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज
आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं आहे. महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले आहेत त्याविषयी चर्चा करण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर एकत्र चर्चेला या. दोघं एकत्र चर्चेला सामोरं जाऊ, असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
“मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा एकदा चॅलेंज देतो कारण मला इतरांकडून उत्तर अपेक्षित नाहीय. त्यामुळे मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देतो की, मीडियासमोर माझ्यासोबत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करायला या”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलंय. त्यावर मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाईस असेल किंवा इतर हे सगळे प्रकल्प आपल्या राज्यातून गेलेच कसे यावर चॅलेंज करावं. इतर लोकं नुसता आरोप करतात. मध्यंतरी टाटाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्रात येण्यासारखं वातावरण नाही, असं सांगतिलं. पण त्या उच्च अधिकाऱ्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. कोण बोललं ते कळलेलं नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिंदे सरकावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यात जाण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना मीडियासमोर चर्चेचं आव्हान दिलं. “घटनाबाह्य सरकार जरी असलं तरी त्याला महाराष्ट्रात पुढे नेण्याची जबाबदारी आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.