‘त्या’ गद्दारांची तुलना शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही; आदित्य ठाकरे यांनी खडसावलं
मंगलप्रभात लोढा यांनी काल शिवप्रताप दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाशी केली होती.
मुंबई: राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी तुलना केली आहे. त्यावरून राज्यात संतप्त पडसाद उमटले आहेत. मंगल प्रभात लोढा यांच्या या विधानाच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर हल्ला चढवला आहे. इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मंगलप्रभात लोढा यांनी काल शिवप्रताप दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाशी केली होती. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही मंगलप्रभात लोढा यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. आज ठाकरे गटाने मुंबईत लोढांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून त्यांचा निषेधही नोंदवला.
इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 1, 2022
मंगलप्रभात लोढा यांना आम्ही चौथीच पुस्तकं भेट देणार आहोत. जेणेकरून त्यांना योग्य इतिहास कळावा. मंगलप्रभात लोढा असं बोलतील असं कधी वाटलं नव्हतं. पण ते जो पर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत फिरू देणार नाही, असा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे.
भाजप केवळ महाराजांचे नाव मतदानासाठी वापरत आहे. वारंवार महाराजांचा अपमान केला जात आहे, असं सांगतानाच महाराष्ट्र बंद विषयीचा निर्णय हा उद्धव ठाकरे घेतील. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.
भाजपला कुठल्या शब्दात बोलावं तेच कळत नाही. एवढं मोठं कांड राज्यपालांनी केल्यानंतरही या लोकांना सदबुद्धी अजून आलेली नाही. आजकाल कोण कशाचीही तुलना करत आहे. कोणत्या तरी गद्दाराची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली जात आहे. औरंगजेबाच्या दरवाजातून येणं आणि स्वतःच्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून जाणं याची तुलना होऊच कशी शकते? असा संतप्त सवालही त्यांनी केला.