मोठी बातमी ! उष्माघाताचे 11 बळी… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा द्या; कुणी केली मागणी?
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण अत्यवस्थ आहेत. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आपने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.
मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे हे मृत्यू झाले आहेत. या घटनेवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी कुणी कुणाची करायची? असा सवाल केला आहे. तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आम आदमी पार्टीने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 50 खोके देऊन आमदार विकत घेऊ शकता. परंतु मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तुटपुंजी रक्कम दिली जाते हा कोणता न्याय आहे? असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीने केला आहे.
आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी हा सवाल केला आहे. तुम्ही आपल्या अमदारांसाठी भाजपकडून 50 खोके घेऊ शकता. पण मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला फक्त 5 लाखाची मदत दिली जाते. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे आणि आम्ही तो कदापी सहन करणार नाही. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.
सरकार काहीच करू शकत नाही
राज्यातील सरकार हे 50 खोक्यांचं सरकार आहे. हे सरकार काहीच करू शकत नाही हे आता जनतेला माहीत झालं आहे. सत्तेची खुर्ची उपभोगावी याकरिता शक्तिप्रदर्शनसाठी महाराष्ट्रातील जनतेची आहुती दिली, तरी त्यांनां चालणार आहे, अशी जळजळीत टीका शर्मा मेनन यांनी केली आहे.
शक्तीप्रदर्शन दाखवायचे होते
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे कडक उन्हात आयोजन करण्यात आले. देशाच्या गृहमंत्र्यांना शक्तीप्रदर्शन दाखवायचे होते म्हणून 42 डिग्री सेल्सिअसमध्ये हजारो लोकांना बसवण्यात आले. उन्हाळ्यात मोकळ्या जागेत राज्यात मोठे मोठे कार्यक्रम घेण्यास बंदी असतानाही महाराष्ट्र भूषण कार्यक्रम हा भर उन्हात घेण्यात आला. राज्य सरकार यातही राजकारण करू पाहते आहे का? असा सवाल त्यांनी केला.
सरकारी कार्यक्रम होता तर तो वातानुकूलित सभागृहात घेता आला असता. परंतु खोके सरकारला शक्ती प्रदर्शन करून आपण काय करू शकतो हे दाखवून द्यायचे होते. पण या शक्तीप्रदर्शनात निष्पाप 13 नागरिकांचा मृत्यू झाला, ही बाब अत्यंत दुर्देवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.