सर्वात मोठी बातमी, अभिनेता सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल असे दिग्गज नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत अभिनेता सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
महाराष्ट्राच्या राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपट, नाटकात काम केलं आहे. तसेच त्यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्येही मोठं काम केलं आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे देखील प्रसिद्ध आहेत. सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी स्वत:हून पुढे येत लाखो झाडे लावली आणि त्यांना मोठं केलं. त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचं सर्वत्र कौतुक झालं. सयाशी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशामुळे पक्षालादेखील फायदा होण्याची शक्यता आहे. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरुवातीला त्यांचं स्वागत केलं.
“सयाजी शिंदे यांचा अजितदादा गटात प्रवेश. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाची सुरुवात केवळ राष्ट्रवादीवरच्या फोकसने सुरू झाली. सयाजी शिंदे खडतर परिस्थितून पुढे आले आहेत. त्यांनी सिनेक्षेत्रात अद्वितीय स्थान निर्माण केलं आहे. मराठी मनाला अभिमान वाटावं असं आहे. त्यांनी आपल्याला सीमित ठेवलं नाही. त्यांनी पर्यावरणावर चांगलं काम केलं आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
छगन भुजबळ काय म्हणाले?
यावेळी छगन भुजबळ यांनीदेखील भूमिका मांडली. “उद्या दसरा आहे. आजच आम्हाला दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभलं आहे. नाव जरी मराठी असलं तरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ते अभिनेते आहेतच. पण आता ते नेते होणार आहेत. कारण सामाजिक कामातही त्यांनी तेवढंच मोठं काम केलं आहे. दक्षिण भारतातही काम केलं आहे. लोकांचं मनोरंजन केलंच. पण लोकांच्या दु:खाला हात घालून ते दु:ख कमी करण्याचं काम त्यांनी केलं. ते सीनिअर आर्टिस्ट आहेत. त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“मराठी माणूस असूनही त्यांनी पहिल्यांदा झेंडा रोवला तो दाक्षिणात्य सिनेमापासून. मला त्यांचं मोठं आश्चर्य वाटतं. रजनीकांत आणि सयाजी यांना त्यांची भाषा कशी समजते, ते कसं काम करतात हे मला कळत नाही. रजनीकांत यांचं आडनाव गायकवाड. ते टॉलिवूडचे देवच झाले आहेत. भाषा बोलणं सोपं आहे. पण सिनेमात बोलणं, एक्सप्रेशन देणं हे कठीण काम आहे. त्यांनी कठिण गोष्टी केल्या. आता राजकारणात त्यांना कठिणाई वाटणार नाही”, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
“तुमचा चेहरा मराठी माणसाला माहीत आहे. सिनेमा, टीव्हीच्या माध्यमातून माहीत आहे. एखाद्याला नेता करताना कष्ट लागतात. पण तुम्हाला नेता करण्यासाठी कष्ट घ्यावी लागणार नाहीत. सयाजी शिंदे यांच्यासारखी मंडळी अनुभवी आहे. राजकारणआातील घडामोडी त्यांना माहीत आहे. ते आमच्याकडे साथ देण्यासाठी आले ही अभिमानाची गोष्ट आहे. सयाजी शिंदे यांचा प्रवेश ही अजितदादांच्या कामाला मिळालेली पावती आहे. आम्ही तुमचा पूर्ण मानसन्मान राखू”, असं छगन भुजबळ म्हणाले.
अजित पवारांची मोठी घोषणा
यावेळी अजित पवार यांनीदेखील भूमिका मांडली. “मी चित्रपट पाहत नाही पण सयाजीराव यांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक कामात त्यांची माझी भेट झाली. मुळात सयाजीरावांना झाडाची आवड आहे. सह्याद्री देवराई याच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपण करतात. त्यांचं मोठं काम आहे. साईबाबांचा प्रसाद, सिद्धीविनायक बाप्पाचा प्रसाद दिला जातो तसा प्रसाद म्हणून रोपटं दिलं जावं असं आम्हाला त्यांनी सांगितलं. अशा विषयावर चर्चा करत असतो. सयाजीराव राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील”, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.