रस्ते घोटाळ्यावरून आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले, “या 3 प्रश्नांचे स्पष्टीकरण द्यावे”
ऑगस्ट महिन्यात आणि आता निविदा काढल्या गेल्या. तेव्हा नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ते कार्यरत नव्हते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका नेमका कोणत्या नगरसेवकांचा उल्लेख करत आहे?
मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रस्ते घोटाळ्यावरून (road scam) राज्य सरकारला सवाल केलेत. मुंबई (Mumbai) महानगरपालिकने मी विचारलेल्या १० प्रश्नांवर प्रतिसाद दिला. परंतु त्यामध्ये अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. व्यावहारिक आणि संभाव्य ‘स्केल’, मोठा घोटाळा आणि टोळधाड ‘सेटिंग’ असे हे ३ प्रमुख प्रश्न अनुत्तरित असल्याचं ते म्हणाले. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना मी आज थेट सांगू इच्छितो की, त्यांनी मला चर्चेसाठी बोलावून मी विचारलेल्या वरील ‘३’ प्रश्नांचे स्पष्टीकरण द्यावे, असं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी केलं.
कंत्राटदारांनी नवीन अंदाजित किमतीनुसार बोली न लावता सुधारित SOR पेक्षा सरासरी ८% जास्त बोली का आणि कशी लावली ?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
पाच बोलीदारांचाच अर्ज कसा?
आजपर्यंत GST हा स्वतंत्रपणे कधीच मोजला गेला नाही, असे असतानादेखील कंत्राटदारांना ६६% वाढीव देयके देऊन GST वेगळा का लावण्यात आला ? फक्त ५ बोलीदारांनीच अर्ज कसा केला. त्या सर्वांना प्रत्येकी एक एक निविदा कश्या मिळाल्या ? आधीच ठरविल्याप्रमाणे बोलीदारांनी बोली लावली. ही एक प्रकारची टोळधाड (कार्टेलायझेशन) नाही का?, असंही ते म्हणाले.
नगरसेवकांची विनंती पत्र पाहू शकतो का?
मुंबई महानगरपालिकेने नमूद केल्याप्रमाणे कोणत्या नगरसेवकांनी या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे सुचविले? ऑगस्ट महिन्यात आणि आता निविदा काढल्या गेल्या. तेव्हा नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ते कार्यरत नव्हते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका नेमका कोणत्या नगरसेवकांचा उल्लेख करत आहे? तसेच निवडलेल्या ४०० किमी रस्त्यांसंदर्भातील नगरसेवकांची विनंती पत्रे आम्ही पाहू शकतो का?
या कंत्राटदारांनी कोणती कामं केलीत?
राष्ट्रीय अनुभव असलेल्या या कंत्राटदारांनी मुंबईसारख्या इतर शहरात कुठे आणि कोणत्या दराने काम केले आहे? मुंबईसारख्या इतर कोणत्या शहरात सगळे कॉंक्रिटचे रस्ते आहेत?, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले आहेत.