शिवसेनेकडून जाहिरातबाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वेमध्ये किती टक्के मिळाली मते

| Updated on: Jun 13, 2023 | 9:53 AM

Narendra Modi and Eknath Shinde : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेकडून जाहिरातबाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वेमध्ये किती टक्के मिळाली मते
विविध विषयांवर चर्चा
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जात होते. मात्र, अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली. ही घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला आहे. त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशा आशयाचे जाहिराती दिसत होत्या. मात्र आता देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

काय आहे जाहिरात

राष्ट्रामध्ये मोदी

महाराष्ट्रात शिंदे

हे सुद्धा वाचा

अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे, असा दावा करणारी जाहिरात करण्यात आली आहे.

काय आहे कौल

भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के कौल राज्यातील जनतेने दिला असल्याचा दावा केला आहे. राज्यातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असे जाहिरातीत म्हटले आहेच.

मुख्यमंत्री पदासाठी कोण

मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. म्हणजेच, राज्यातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली, असल्याचा दावा जाहिरातीत केला आहे.

काय आहे रणनीती

शिवसेनेचा वर्धापनदिन १९ जून रोजी आहे. यावरुन शिवसेना गटांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एका सर्वेचा दावा प्रसिद्ध केला आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे जास्त लोकप्रिय असल्याचे जाहिरातीत म्हटले आहे.

विरोधक काय म्हणतात…

तुमची जाहीरात खोटी आहे, जनतेच्या मनात धूळ फेकणारी आहे. या सर्वेक्षणाला आधार काय आहे?, ही तर पक्षाची जाहीरात आहे. जनता तुमच्या बाजूने राहिली नाही, अशी टाका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे चांगले प्रोड्यूसर आहेत, दिग्दर्शन पण ते करु शकतात, परंतु हा प्रकार प्रोजेक्शनचा आहे. राजकारणात २ आणि २ चार होत नाही, दोन आणि दोन सहा पण होतात, असे दानवे यांनी म्हटले आहे.