Mumbai Police : नागपूर राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, उचललं महत्त्वाच पाऊल
Mumbai Police : रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी काही पावलं उचलली आहेत.

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन आठवड्याच्या सुरुवातीला नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. नागपूरच्या महाल भागात हा राडा झाला होता. यामध्ये वाहन फोडण्यात आली, वाहनांना आगी लावण्यात आल्या. जाळपोळ, हिंसाचार झाला. पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले. नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत.
मुंबईत एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर परिसरात आणि संवेदनशील भागात मॉकड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला. रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉकड्रील करण्यात आलं. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ मापखान परिसरात हे मॉकड्रील पार पडलं.
मॉकड्रिलमध्ये किती पोलीस?
या मॉकड्रिल मध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे जवळपास 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोबत अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. यावेळी हिंसाचार घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहचून परिस्थितीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवतात, मॉकड्रिलच्या माध्यमातून पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सायबर गुन्ह्यात चोरी झालेले दीड कोटी 24 तासात मिळवून दिले
मुंबई क्राइम ब्रांचच्या 1930 सायबर हेल्पलाइन टीमने विविध सायबर फसवणुकीतून नागरिकांची चोरी गेलेली 1.49 कोटी रुपये केवळ 24 तासात परत मिळवण्यात यश मिळवलं. 21 मार्च 2025 रोजी हेल्पलाइनला 110 तक्रारी मिळाल्या होत्या, ज्या तत्काळ नॅशनल सायबरक्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCCRP) वर नोंदवण्यात आल्या. गुन्ह्यांमध्ये गुंतवणूक घोटाळे, शेअर ट्रेडिंग फसवणूक, सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन खरेदी घोटाळे आणि बनावट WhatsApp प्रोफाइलद्वारे पैसे उकळणे यांचा समावेश होता.
मुंबई पोलिस, बँक नोडल अधिकारी आणि 1930 हेल्पलाइन टीमच्या जलद समन्वयामुळे एकूण १,४९,८७,३७६ रुपये गोठवण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक पौनी मंगेश भोर, अभिजित राऊळ, प्रजनल वालावलकर, किरण पाटील आणि सोनाली काकड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पोलिसांनी नागरिकांना 1930 हेल्पलाइनवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अवैध शेअर ट्रेडिंग आणि WhatsApp फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.