मुंबई- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत आमदारांचे मत महत्त्वाचे असल्याने भाजपा आणि शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले असून, त्यांची मतदानापर्यंत हॉटेलात राहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचा निरोप दिला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईत पोहचण्याचे आदेश सर्व आमदारांना देण्यात आले आहेत. यासह राष्ट्रवादीच्यासहयोगी आमदारांनीही मुंबईत पोहचावे असे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये मुक्कामाला असणार आहेत. शनिवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार असून, यात विधान परिषदेची रणनीती ठरवण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रवादीच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पाठवण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने या निनवडणुकीसाठी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. यातील एकनाथ खडसेंना पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. खडसेंना उमेदवारी दिली नाही तर निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव भाजपाने दिला होता, असेही त्यांनी सांगितले आहे.
राज्यसभेत मिळवलेल्या विजयानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. राज्यसभेचीच पुनरावृत्ती विधान परिषदेत होईल, असा दावा भाजपाचे नेते करीत आहेत. मात्र विधान परिषदेच्या निवकालानंतरच कुणाचं कौशल्य चांगलं आहे, हे दिसेल असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे आव्हान स्वीकारले आहे. राज्यसभेची निवडणूक ज्या प्रकाराने शिवसेना विरुद्ध भाजपा अशी झाली होती. तशी ही विधान परिषद निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी होण्याची शक्यता आहे.