मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल नेमका काय आहे, यासंदर्भात माहिती दिली. तसेच आपण निकालाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकार पूर्णपणे कायदेशीर असल्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला.
काय म्हणाले फडणवीस
सरकार पूर्ण कायदेशीर
सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अपात्रतेसंदर्भातील अधिकार अध्यक्षांना आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकारीही अध्यक्षांना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते आता त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना टोला
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. तुम्ही नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही.
एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही
एकनाथ शिंदे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा जो निर्णय घेतला, तो सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला.