Air India Building : या इमारतीत देशात सर्वात आधी लागले होते सरकते जिने, लवकरच बनणार मंत्रालय
नरीमन पॉईंटची शान असलेली एअर इंडीयाची इमारत लांबूनही ओळखता येते. या इमारतीत काय खास आहे की राज्य सरकार 1600 कोटीही द्यायला एका पायावर तयार आहे.
मुंबई : मुंबईची नरीमन पॉईंट येथील आयकॉनिक एअर इंडीयाची उंच इमारत खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने आता नवा 1600 कोटीचा ताजा प्रस्ताव ठेवला आहे. या इमारतीत मंत्रालयातील अनेक कार्यालये शिफ्ट करून तिला ‘विस्तारित मंत्रालय’ असा दर्जा देण्याचा सरकारचा इरादा आहे. मात्र, या 23 मजली इमारतीला 2018 साली एअर इंडीयाने विकण्याचा इरादा जाहीर केला होता. या इमारतीत मुंबईतील सरकते जिने प्रथम लावण्यात आले होते.
नरीमन पॉईंट येथील प्रतिष्ठीत एअर इंडीयाच्या इमारतीला 1600 कोटी रुपायात विकत घेण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. या इमारतीत मंत्रालयातील अनेक कार्यालये हलविण्याची तयारी राज्य सरकारने आखली आहे. परंतू राज्य सरकारला ही इमारत पूर्ण रिकामी करून पाहीजे आहे. एआय एसेट्स होल्डींग लिमिटेड या इमारतीची मालक आहे. त्यानी राज्य सरकारच्या 1600 कोटी रूपयांच्या प्रस्तावावर सहमती व्यक्त केली आहे. याआधी आघाडी सरकारच्या काळात 1450 कोटी रूपयांचा प्रस्ताव तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवला होता.
वर्ल्ड क्लासचे टाटांचे स्वप्न
एअर इंडीयाचे स्वप्न जेआरडी टाटांनी 1932 मध्ये पाहिले होते. जेव्हा एअर इंडीया सरकारच्या ताब्यात गेली तेव्हाही तिचे नेतृत्व टाटांच्या हातात होते. एअर इंडीया तेव्हा हायफाय होती. तिचे बुकींग कार्यालय एअर इंडीयाच्या या गगनचुंबी इमारतीत होते. त्याकाळी एअर इंडीया ऐनभरात होती. तेव्हा नरिमन पॉइंटची ही इमारत देखील वर्ल्ड क्लास एअरलाईन्स बनविण्याच्या टाटांच्या स्वप्नाचाच एक भाग होती.
एअर इंडीया इमारतीबद्दल एअर इंडीयाचे माजी कार्यकारी संचालक तसेच ‘The Descent of Air India’ चे लेखक जितेंद्र भार्गव यांनी म्हटले आहे की या इमारतीचे डीझाईन अमेरिकन आर्किटेक्ट जॉन बरगी यांनी केले होते. ही इमारत त्याकाळाच्या पुढची होती. जेआरडी टाटा यांची दिव्य दृष्टी यामागे दिसते.
लोक एस्केलेटर पाहायला यायचे
या इमारतीत देशातला पहिला एस्केलेटर लागला होता. तो ग्राऊंड फ्लोअर ते फर्स्ट फ्लोअर पर्यंत जातो. तेथे एअर इंडीयाचे बुकींग ऑफीस बनविले होते. त्यावेळी हे वीजेवर चालणारे सरकते जिने खास पाहाण्यासाठी येथे मुद्दामहून लोक यायचे. तसेच या इमारतीत एक सर्वात छोटी लिफ्टही होती, ती केवळ 22 व्या मजल्यावरून 23 व्या मजल्यावर जाण्यासाठी वापरली जायची 23 व्या मजल्यावर कंपनीच्या संचालक मंडळाचे सभागृह होते.
मरीन ड्राईव्हची ओळख
12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्यावेळी या इमारतीच्या बेसमेंटमध्ये कारमध्ये लपवलेल्या आरडीएक्सचा ब्लास्ट होऊनही या इमारतीला काहीही झाले नव्हते. ही मुंबईच्या सुरूवातीच्या काही हायराईस बिल्डींग पैकी एक आहे. या इमारतीला मरीन ड्राईव्हवरून फिरताना अगदी मलबार हीलहूनही ओळखता येते. या इमारतीच्या गच्चीवर एअर इंडीयाचा फिरता लोगो ‘Centaur’ लावण्यात आला आहे. तो लांबूनही दिसतो. या इमारतीच्या शेजारी गगनचुंबी एक्सप्रेस टॉवर आणि ओबरॉय शेरेटन हॉटल आहे.