‘मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी माझी माफी मागितली’, ऑडिओ क्लिप ऐकवत अजय बारसकर यांचा खुलासा
अजय बारसकर यांनी आज पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. मनोज जरांगे यांचे सहकारी डॉ. तारक, श्रीरामभाऊ या व्यक्तींचे ते ऑडिओ क्लिप असल्याचा दावा अजय बारसकर यांनी केला.
मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांनी लोणावळ्यात बंद दाराआड वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी बंद दाराआड नेमकी काय डील झाली? असा सवाल अजय बारसकर यांनी केलाय. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली नाही. त्याऐवजी त्यांनी सगेसोयरे मागणी केली, असा दावा अजय बारसकर यांनी केला. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला फोन करुन माफी मागितली, असा दावा अजय बारसकर यांनी केला. तसेच मनोज जरांगे यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं अजय बारसकर म्हणाले.
“माझ्यावर फक्त दोनच गुन्हे चालू आहेत. जरांगे यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. बलात्कार आणि विनयभंग असे आरोप माझ्यावर कुठल्याही पुराव्याशिवाय केले जात आहेत. एक शेतकरी प्राणी प्रश्नाची केस आहे आणि दुसरी एका शेतकऱ्याच्या मुलाला विजेचा करंट लागल्यामुळे मी एएसईबी संदर्भातली केस सुरू आहे. जरांगे यांनी प्रसारमाध्यमांवरही आरोप केले. ही संस्कृती नाही. माझी 300 कोटींची प्रॉपर्टी आहे. मी सरकारकडून 40 लाख रुपये घेतले असे आरोप केले गेले. महाराजांच्या पुतळ्याच्या खाली जे झालं त्यासंदर्भात माझ्याकडे माफी मागण्यात आली. माझ्याकडे पुरावा आहे”, असा दावा अजय बारसकर यांनी केला.
अजय बारसकर यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली
अजय बारसकर यांनी ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. मनोज जरांगे यांचे सहकारी डॉ. तारक, श्रीरामभाऊ या व्यक्तींचे ते ऑडिओ क्लिप असल्याचा दावा अजय बारसकर यांनी केला. “कालपर्यंत मी चांगला होतो आता मी सगळ्यांसाठी वाईट झालो. जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि माझी माफी मागितली. जरांगे यांच्यासोबत असलेले डॉ. तारक, श्रीरामभाऊ यांचा फोन आला होता ते जरांगे यांच्यासोबत असतात”, असं अजय बारसकर म्हणाले.
“जसा मी महाराज आहे तसा वकिलही आहे. त्यामुळे मला शंका आली तसे मी सगळे पुरावे जमा करायला सुरुवात केली. माझा अपमान झाला. त्यांनी माफी मागितली. त्यानी परत आम्हाला बोलावलं. अपमान गिळून आम्ही पुन्हा गेलो. हा हेकड माणूस आहे. सगळे माझी वाट बघत बसले होते. आम्ही सगळे बोलत बसलो होतो. त्यांचा जीव वाचवावा म्हणून उपोषण त्या सोडवाव म्हणून आम्ही जे काही बोललो”, असं स्पष्टीकरण अजय बारसकर यांनी दिलं.