‘लोणावळ्यात बंद दाराआड काय डील झाली?’; अजय महाराज बारसकर यांचे मनोज जरांगेंवर अतिशय गंभीर आरोप
"लोणावळ्याच्या सभेत आतमध्ये जी गुप्त बैठक झाली त्यामध्ये सरसकट हा शब्द सोडून दिला. परत भाषण करायला आले तेव्हा आपल्याला सर असं एवढं बोलले आणि लक्षात आलं त्यानंतर सगेसोयरेचा कायदा झाला पाहिजे, असं म्हणाले. अंतरवालीत निघाले सरसकटसाठी आणि लोणावळ्यात सगेसोयरेवर आले. अहो जरांगे पाटील असं काय झालं की, तुम्ही सरसकट शब्द सोडला?", असा सवाल अजय महाराज बारसकर यांनी केला.
मुंबई | 24 फेब्रवारी 2024 : अजय महाराज बारसकर यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका बदलण्यासाठी सरकारसोबत डील केल्याचा गंभीर आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे. “मी मराठा आहे. मला माहिती आहे की, चळवळ किती दिवसांनी उभी राहते. किती दिवसांनी यश येतं. पण या माणसाची अक्कल शून्यता आहे, आम्ही काय आरोप केले? आमचा आरोप हा अपारदर्शतेचा होता, सगळ्या मिटिंगसाठी चॅनल लावले, लोकांनी डोक्यावर घेतलं. लोणावळ्यात तुम्ही बंद दाराआड का बैठक घेतली? उच्च स्तरीय सरकारी अधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड का बैठक घेतली? त्यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला तर जरांगेंनी आपल्याला थंडी वाजत होती, असं उत्तर दिलं”, असं अजय बारसकर म्हणाले.
“हजारो मराठा तरुण लोणावळ्यात बाहेर झोपले आहेत. त्यांना थंडी नाही वाजत? त्यांनाही थंडी वाजते. आपल्याकडे रेकॉर्डेड उत्तर आहे. थंडी वाजत होती मग मीडियाला आतमध्ये का नाही नेलं? लोणावळ्याच्या बंद बंगल्यात काय चर्चा केली? काय डील झाली? उत्तर द्यावं लागेल. तुम्ही 36 तास वाशीमध्ये थांबलात. जसं एखादा नवरदेव पारावर येतो, आणि मला घड्याळच पाहिजे, गाडी पाहिजे, कपडे घालणार नाही म्हणत रुसून बसतो तसा हा रुसून बसला. 36 तास काय डील चालू होती? तुम्ही मला कितीही शिव्या द्या. मी तुम्हाला काही बोलणार नाही”, असं बारसकर महाराज म्हणाले.
बारसकर यांनी ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली
“भावनात गुंतवून भडकवलं जातंय. पण एकाने मला उत्तर दिलं नाही. मी आज पुरावा दाखवला. 14 तारखेच्या कोट्यवधींच्या सभेत त्या सभेत जरांगे पाटलांनी 6 मागण्या केल्या. त्या सभेत तुमच्या मागण्या काय होत्या?” असा सवाल करत बावसकर यांनी मनोज जरांगे यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. महाराष्ट्राच्या मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा. मराठा समजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळावं. कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या हरामखोर नराधमांना फाशी देण्यात यावी, असं मनोज जरांगे ऑडिओ क्लिपमध्ये बोलत असल्याचं त्यांनी निदर्शनात आणून दिलं. यावेळी त्यांनी पुन्हा मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले.
बारसकर यांचा खोचक सवाल
“लोणावळ्याच्या सभेत आतमध्ये जी गुप्त बैठक झाली त्यामध्ये सरसकट हा शब्द सोडून दिला. परत भाषण करायला आले तेव्हा आपल्याला सर असं एवढं बोलले आणि लक्षात आलं त्यानंतर सगेसोयरेचा कायदा झाला पाहिजे, असं म्हणाले. अंतरवालीत निघाले सरसकटसाठी आणि लोणावळ्यात सगेसोयरेवर आले. अहो जरांगे पाटील असं काय झालं की, तुम्ही सरसकट शब्द सोडला? काय झालं? तुम्ही समाजाला सांगाना. जो ड्राफ्ट आम्ही 18 तारखेला दिला तोच ड्राफ्ट तुम्ही वाशीत स्वीकारला आणि गुलाल लावला. तुम्ही ती मागणी का सोडली? लोणावळ्यात अशी काय डील झाली?”, असा खोचक सवाल अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांना केला.