‘मी नार्को टेस्टला तयार, उद्या 11 वाजता इथे बॉम्ब फुटणार’, अजय बारसकर यांचा मोठा दावा
अजय महाराज बारसकर उद्या माध्यमांसमोर जरांगेंच्या विरोधात पुरावे सादर करणार आहेत. यासाठी ते उद्या पुन्हा 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच पत्रकार परिषद घेणारी लोकं देखील उद्या वेगळी असतील असं बारसकर म्हणाले आहेत.
मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : अजय महाराज बारसकर यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजय बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं. याउलट त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनोज जरांगे यांनी लोणावळ्यात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीत नेमकी काय डील झाली? असा सवाल त्यांनी केला. तसेच मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत आला तेव्हा कुणाचे कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहीलं? असाही सवाल अजय बारसकर यांनी केला. तसेच आपल्याकडे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप असल्याचा दावा अजय बारस्कर यांनी केलाय. जरांगे यांच्या पाहुण्यांकडे वाळू काढायच्या इतक्या डंपर गाड्या कशा आल्या, रातोरात इतका पैसा कसा आला, वाळूचा धंदा चालतो, असा गंभीर आरोप अजय बारसकर यांनी केला. तसेच जरांगे यांनी संभाजीराजेंच्या नावाखाली पैसे खाल्ले, त्यांच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, असा दावा अजय बारसकर यांनी केला. असे अनेक गंभीर आरोप अजय बारसर यांनी केले आहेत.
अजय बारसकर एवढ्यावरच थांबले नाहीत. ते आणखी माध्यमांसमोर जरांगेंच्या विरोधात पुरावे सादर करणार आहेत. यासाठी ते उद्या पुन्हा 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच पत्रकार परिषद घेणारी लोकं देखील उद्या वेगळी असतील असं बारसकर म्हणाले आहेत. “मी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि इतर चाचण्यांना सामोरे जायला तयार आहे. तुम्ही पारदर्शक असल्याचे म्हणतायत तर माझ्यासहीत तुम्हीही या चाचण्यांना समोर या. उद्या 11 वाजता इथे बॉम्ब फुटणार आहे. उद्या 11 वाजता या. मी खुलासा करेन. उद्या पत्रकार परिषद घेणारी लोक वेगळी असतील”, असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी दिला.
‘मला तुकोबरायांच्या वंशजांपासून जागा मिळालीय’
“भंडारा डोंगर हे देहूपासून काही अंतरावर आहे ते ठिकाण तुकोबरायांशी सबंधित ठिकाण आहे. माझी तिथे 17 गुंठे जागा आहे. माझं तिथे ज्ञानपीठ आहे. तिथे मला तुकोबरायांच्या वंशजांपासून जागा मिळालीय. त्याच उताऱ्यावर माझं नाव आहे. देहू संस्थानाच्या आर्थिक आणि इतर व्यवहार प्रक्रियेशी जरी थेट सबंध नसला तरी माझी ही बाजू आहे”, असं बारसकर यांनी स्पष्ट केलं.
“मनोज जरांगे त्यादिवशी झोपले होते. ते माझ्याकडे पाहत नव्हते म्हणून त्या दिवशी माझी ओळख त्यांना कानात सांगत होतो. त्यावेळी तेच म्हणाले की, 15 दिवसातून एकदा आलात. मला ते आधीपासून ओळखतात, असं अजय बारसकर म्हणाले. तसेच मी आमदार बच्चू कडूंवर आता नाराज आहे. ते संकटकाळात उभे राहिले नाहीत”, अशी भूमिका अजय महाराज बारसकर यांनी मांडली.