मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सध्या दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विचारांच्या विरोधात जावून भाजप आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. असं असलं तरी आता पवार कुटुंबीय काका-पुतण्यांमधील वाद शमवण्यात यशस्वी होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज काही अनपेक्षित घटना घडल्या आहेत.
अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी आज वाय बी चव्हाण सेंटर येथे जावून शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. युगेंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी श्रीनिवास पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
या भेटीगाठींमागे खरंच काहीतरी घडतंय का? पवार कुटुंबिय पुन्हा काका-पुतण्यांमधील मतभेद दूर करण्यात यशस्वी होतात का? ते पक्षात डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होतात का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. या अशा भेटींमुळे चर्चा होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याआधीदेखील अशी घटना घडली आहे.
विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी पार पडला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी मध्यस्थी केली होती. स्वत: शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात याबाबतचा उल्लेख केला आहे.
प्रतिभा पवार यांच्या मध्यस्थीने त्यावेळी पवार कुटुंबातील कुटुता दूर सारण्यात आली होती. आतादेखील गोष्टी जास्त चिघळण्याआधी प्रयत्न केले तर डॅमेज कंट्रोल होऊ शकतं. त्यासाठीच आता पवार कुटुंबिय सक्रीय झाले तर नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका सुरु केलीय. त्यामुळे व्यथित झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांना फोन केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पण श्रीनिवास हे परदेशात होते. ते आता पुन्हा मुंबईत आले आहेत. त्यानंतर आजच्या भेटीगाठी घडून आल्या आहेत. या सगळ्या घडामोडी पाहता पवार कुटुंबिय खरंच पक्ष फुटीवर मार्ग काढण्यात यशस्वी होतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात नाहीय. रोहित पवार हे देखील अजित पवार यांच्यावर बोलताना सावध प्रतिक्रिया देत आहेत. याउलट ते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.