मुंबईः महाराष्ट्र जातीय सलोखा राखणारा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन समजात तेढ निर्माण करायचं कारण नसतं. महाराष्ट्रात दरी निर्माण करून काहीही साध्य होणार नाही. जातीय सलोखा कधी डोक्यात येत नाही. हे सारखं सांगूनही, नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणणे, हा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. ह्या घटना घडल्या, जखमा झाल्या, तर त्या खोलवर जातात. त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतात ह्याची गरज नाही, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते मुंबईत बोलत होते. तर पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) दर कपातीचा निर्णय आज होणार नाही, हे सुद्धा त्यांनी सांगितले. आर्थिक बोजाचा विचार करावा लागेल. केंद्र सरकारला महाराष्ट्र सर्वाधिक टॅक्स देतो. त्यामुळे इंधनावरील राज्य आणि केंद्र सरकारची (Central Government) कर मर्यादा ठरवावी लागेल. केंद्राकडून जीएसटीचे पैसे यायचे बाकी आहेत. ते पैसे लवकर येतील असा अंदाज आहे. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधन कपातीचा विषय नाही, असे म्हणत अजित पवारांनी महाराष्ट्रवासीयांची घोर निराशा केली.
अजित पवार म्हणाले की, भोंग्याबाबत आम्ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यात मनसे सोडले तर सर्व पक्षांनी त्यांची भूमिका मांडली. कारण नसताना वातावरण खराब करू नका. मिळून मिसळून काम करा. उद्या निर्णय घ्यायचं ठरलं, तर ठराविक वर्गासाठी निर्णय घेता येणार नाही. बाकीचे कोर्टात जातील. मागे वेगवेगळे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
अजित पवार म्हणाले की, योगी यांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, महाराष्ट्राची शिकवण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे. सर्व जाती, धर्माला न्याय देणारी आहे. इतके वर्ष हे सगळं चालत आलं. ह्याधी कोणी थांबवलं होतं. आता मागणी करतात. मग उद्या वेगळे इश्यू येतील. कोर्टाने आदेश काढले, तर इतर भाविकांवर परिणाम होईल.