मुंबई | 1 जानेवारी 2024 : महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. या पाणबुडी प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. “हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगण्याचे हिंमत राज्य सरकारमध्ये नाही”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “प्रकल्प बाहेर कसे जातील, आम्ही काय आज राज्य चालवतोय का?”, असा सवाल अजित पवार यांनी केलाय. “पाणीबुडी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. निवडणुकीच्यादृष्टीने तरुणांमध्ये रोष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे”, अशी टीका अजित पवार यांनी केला.
“फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पाच्यावेळी देखील असंच आश्वासन होतं. याच पद्धतीने कोणतेच प्रकल्प महाराष्ट्रातून चालले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा याचा संशय आला होता. एकीकडे एक चित्र दाखवायचं, पण दुसरीकडे वस्तुस्थिती वेगळी असते. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाही, ही सांगण्याची त्यांची परिस्थिती दिसत नाही. हे महाराष्ट्रासाठी दुर्देवी आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तसं अजितबात झालेलं नाही. मी म्हणूनच मगाशी बोलताना म्हणालो, अशाप्रकारे प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी गप्प बसतील का? आम्ही काय आज राज्य करतोय का? आम्हाला राज्य चालवण्याचा अनुभव नाही का? त्यामुळे आज निवडणुकीच्या निमित्ताने दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही. तरुणांच्या-तरुणींच्या मनात रोष कसा निर्माण होईल, अशाप्रकारचा त्यांचा केविलवाना प्रयत्न सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे. “डोळ्यावर कातडं आणि तोंडाला कुलूप लावून बसले आहेत, इतकं नामर्द सरकार आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी “इंडिया आघाडीत आल्यावर 10 वर्षात सरकारने कसं खोकलं केलंय ते सांगू”, असा इशारा दिला आहे.