मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या नव्या राजकीय घडामोडींचं नारळ फोडण्यात आलंय. आता राजकीय संघर्षाला सुरुवात झालीय. आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. तसेच पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून तर एक खूप मोठी बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे महत्त्वाची पार पडलीय. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,माजी आमदार पंकज भुजबळ,युवक अध्यक्ष सुरज चव्हाण,प्रमोद हिंदुराव,शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे,सुनीता शिंदे,सिद्धार्थ कांबळे, अड रविंद्र पगार,मुकेश गांधी,अर्शद सिद्दीकी,महेंद्र पानसरे, संजय तटकरे,संतोष धुवाळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत एक मोठी घोषणा करण्यात आलीय. अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलीय. अजित पवार यांनी समीर भुजबळ यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड केली आहे. अजित पवार यांनी आजच्या बैठकीत याबाबत घोषणा करत समीर भुजबळ यांना नियुक्तीपत्र देखील दिलं.
“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेत मंत्री छगन भुजबळ यांचे मोठ योगदान आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी बॅकस्टेजला राहून समीर भुजबळ यांनी पार पाडली. आज मुंबई अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील”, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. “मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे. समीर भुजबळ यांनी खासदार म्हणून अतिशय उत्तमरीत्या आपली जबाबदारी पार पाडली. विकासाची अनेक कामे त्यांनी नाशिकमध्ये केली. त्यांना मुंबई शहरातील देखील बारकावे माहिती आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“गेल्या 25 वर्षात अनेक प्रसंगामध्ये एक व्हिजन घेऊन काम करून यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या रूपाने पक्षाकडे एक व्हिजन असलेलं, अनुभवी युवा नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. ते मुंबई शहरात अधिक लक्ष देऊन मुंबईत क्रांती घडविण्याचे काम त्यांच्याकडून होईल. त्यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल”, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.