शरद पवार गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी, अजित पवार गटाची मोठी खेळी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत आहेत. शरद पवार गटाला धक्का देण्यासाठी अजित पवार गट वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखत आहे. अशाच एका रणनीतीचा भाग म्हणून अजित पवार गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
अक्षय कुडकेलवार, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. हा निकाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने लागला आहे. पण तरीदेखील दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगानेदेखील अजित पवार यांच्या गटाला मुख्य पक्ष म्हणून मान्यता देत पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी पार पडली. या निवडणुकीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारल्याची माहिती समोर आली होती. तसेच शरद पवार गटाला सात दिवसात चिन्ह देण्यात यावं, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे या प्रकरणाची केस शरद पवार गटाच्या बाजूने काहीशी झुकली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण या सुनावणीला 24 तास पूर्ण होत नाही तेवढ्यात अजित पवार गटाने शरद पवार गटाला घेरण्यासाठी मास्टरप्लॅन तयार केल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाला अजित पवार गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. नार्वेकरांनी आपल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांना अपात्र न करण्याच्या निकाल दिलाय. या निकाला आता हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
अजित पवार यांच्या बंगल्यावर खलबतं
विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्यांची आज अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर ही बैठक पार पडत आहे. खरंतर ही अजित पवार गटाची मंगळवारची नियमित नियोजित आठवडा बैठक असल्याचं मानलं जात आहे. पण या बैठकीत पक्षांतर्गत आणि इतर अनेक म्हत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. बैठकीत पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ , मंत्री अदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आमदार आशुतोष काळे, मुंबई राकांपा अध्यक्ष समीर भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.