संभाजी महाराज यांच्याबद्दलचं विधान अजित पवार मागे घेणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन, मोठा वाद निर्माण झालाय. पण 4 दिवसांपासून अजित पवार माध्यमांपासून दूर आहेत. मात्र अजित पवार उद्या आपली भूमिका मांडू शकतात. तर शरद पवारांना मात्र अजित पवारांचं वक्तव्य मान्य नाहीय.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांविरोधतली आंदोलन काही थांबताना दिसत नाहीय. कारण भाजपनं आता थेट माफी मांगो आंदोलन सुरु केलंय. अद्याप अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं नसलं, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिलीय. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर काहीही म्हणा. धर्मवीर म्हटलं तरी काहीही वावगं नाही, असं पवार म्हणालेत. पण 30 डिसेंबरनंतर अजित पवार माध्यमांसमोर आलेले नाहीत. बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात अजित पवार पत्रिकेत नाव असून आले नाही.
मात्र आता बुधवारी पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवार आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. आक्रमक झालेले सत्ताधारी आणि हिंदू संघटनांनंतर अजित पवार नेमकं काय बोलतात हे कळेलच. पण तोपर्यंत अजित पवारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळणं सुरुच आहे.
सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी, विजयदुर्ग किल्ल्यावरुन अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्यांचा कडेलोट करुन निषेध करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन, अजित पवार आधी वादात अडकले. नंतर औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यामुळं राष्ट्रवादी आणखी सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आली.
पण छत्रपती संभाजीराजेंवरुन अजित पवारांच्या परस्पर विरोधी मत आव्हाडांनी व्यक्त केलंय. छत्रपती संभाजीराजे धर्मवीर होते असं आव्हाडांचं म्हणणंय.
ठाकरे गटानं अजित पवारांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केलंय. छत्रपती संभाजीराजे धर्मवीर आहेतच असं अंबादास दानवे म्हणालेत.
अजित पवार 4 दिवसांपासून माध्यमांपासून दूर आहेत. पण बुधवारी अजित पवार माध्यमांसमोर येण्याची शक्यता असून, दादा आपली भूमिका स्पष्ट करु शकतात.