अजित पवारांना घशाचं इन्फेक्शन, राष्ट्रवादीकडून अधिकृत माहिती जारी, नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घशाचं इन्फेक्शन झाल्याची माहिती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार प्रचारावेळी पाण्यात भिजले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली, अशी माहिती आता समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच मुंबईत रोड-शो झाला. या रोड-शोमध्ये भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी रोड शोमध्ये हजेरी लावली. मोदींचा रोड शो अतिशय भव्यदिव्य असा होता. या रोड शोमध्ये मुंबईकरांनीदेखील प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. इतक्या भव्यदिव्य रोड शोला महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार नाराज आहेत का? अशी चर्चा रंगू लागली होती. अखेर अजित पवार मोदींच्या रोड-शोमध्ये का उपस्थित नव्हते? याबाबतची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांना घशाचं इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. घशाचं इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितलं आहे. अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. अजित पवार पावसात भिजल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात इन्फेक्शन झालंय. त्यामुळे ते मोदींच्या मुंबईतील रोड शोमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. पण अजित पवार उद्यापासून प्रचारात सहभागी होतील, असं उमेश पाटील यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे बारामतीची निवडणूक झाल्यापासून अजित पवार हे गायब असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उमेश पाटील नेमकं काय म्हणाले?
“अजित पवार यांच्याबाबतच्या विविध बातम्या येत राहतात. ते नॉट रिचेबल नाहीयत आणि नाराजही नाहीयत. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांना काही प्रमाणात थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे. ते इन्फेक्शन इतरांना होऊ नये कारण त्यांना इतर ठिकाणी प्रचाराला जायचं असतं. ते व्हायरल इन्फेक्शन असतं त्यामुळे ती काळजी घेतली जाते. डॉक्टरांचा सल्ला मिळाला की निश्चितपणे ते कदाचित उद्या प्रचारात सहभागी होतील”, असं उमेश पाटील यांनी सांगितलं.