ट्विटरवर जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? मास्टरमाइंड शोधा; अजित पवार यांची मागणी
कारण नसताना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला आहे. त्यांनी विधाने केली नसती तर हे मुद्दे पुढे आले नसते. गाड्या फुटल्या नसत्या.
मुंबई: ज्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्या नावाने ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर अकाऊंट माझं नव्हतं, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? याची शहानिशा करून दूध का दूध आणि पानी का पानी करावं. तसेच यामागचा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच सीमावादा प्रश्नी बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
आज 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मिटिंग आहे. त्यावेळी मी सीमावादाचा विषय काढणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावाद प्रश्नी कर्नाटकाची बाजू मांडण्यासाठी मुकूल रोहतगींची नेमणूक केली आहे. त्याच धर्तीवर आपणही हरीश साळवे यांची नेमणूक करायला हवी. त्याबाबतची मागणी मी उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
कारण नसताना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला आहे. त्यांनी विधाने केली नसती तर हे मुद्दे पुढे आले नसते. गाड्या फुटल्या नसत्या. मराठी भाषिकांना त्रास झाला नसता. महाराष्ट्राच्या बॉर्डरवरील गावांमध्ये महाराष्ट्र सोडण्याची भावना निर्माण झाली. ती झाली नसती. यातून कर्नाटक सरकारनेही समंजस भूमिका घ्यायला हवी. तर महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही 17 तारखेला मोर्चा काढत आहोत. विविध मुद्द्यांवर हा मोर्चा निघत आहे. त्यात महापुरुषांच्या अवमानासह सीमाप्रश्नही आहे. मागे अमित शाह यांनी बैठक घ्यायचं ठरवलं तेव्हा बोम्मई यांनी मी जाईल न जाईल हा माझा प्रश्न असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी संमजस भूमिका घेतल्याचं दिसतं. शाह यांच्याकडे जे घडलं, त्यानुसार त्यांनी वागलं पाहिजे. दिल्लीत ठरल्याप्रमाणे दोन्ही राज्यांनी वागावं, असं आवाहन त्यांनी केलं.
ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? त्यातून लोकांच्या भावनेचा उद्रेक झाला. काही जणांचं म्हणणं आहे की हे काम विरोधकांनी केलं. तशी संशयाची सूई व्यक्त केली आहे. आम्ही कधीच राज्याच्या, देशाच्या एकसंघतेला धक्का लावला नाही. चुकीचं काम होणार नाही हाच दृष्टीकोण सर्व राजकीय पक्ष ठेवत असतात. पण केंद्राला शंका वाटत असेल तर त्यांनी दूध का दूध, पानी का पानी करावं. यामागचा मास्टरमाइंड शोधावा, असं ते म्हणाले.
बोम्मई यांनी तसं स्टेटमेंट केलं नसतं तर हा वाद निर्माण झाला नसता. नंतर जत गावाबद्दलचं वक्तव्य झालं. अशा प्रकारातून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम हे करत असल्याची भावना राज्याच्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे, असंही ते म्हणाले.