किरीट सोमय्या म्हणाले, जय पवार यांचे कारनामे उघड करणार; अजित पवार म्हणतात, महत्त्व देण्याची गरज नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हजार 55 कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आता पुढे बघा काय होतं. अजित पवार यांचा मुलगा जय अजित पवार याचे कारनामे उघड करणार आहे.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची एक हजार 55 कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आता पुढे बघा काय होतं. अजित पवार यांचा मुलगा जय अजित पवार (jay pawar) याचे कारनामे उघड करणार आहे. तो तुरुंगात जाईल, असं खळबळजनक विधान भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केलं आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने खळबळ उडालेली असून याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर कोण काय बोलतं याला महत्त्व देण्याची गरज नाही. या देशात नियमांचे उल्लंघन कोण करत असेल तर त्यांना आळा घालण्यासाठी कायदे आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, सोमय्या जय पवार यांचे कोणते कारनामे उघड करणार याविषयीचे तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना किरीट सोमय्यांच्या दाव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजितदादांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कायदा सर्व श्रेष्ठ असतो. या देशात नियमाचे उल्लंघन कोण करत असेल तर कायदे आहेत. कायदे पाळले जात नसतील तर खपवून घेतलं जात नाही. पण काही लोकं नुसतंच केवळ विधानं करत असतात. काही चॅनेलने तर कोणत्या दिवशी काय विधाने केली हे दाखवलं आहे. त्यामुळे अशा लोकांना अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. -उद्या ते कुणाचंही नाव घेणार आणि तुम्ही प्रश्न विचाराल हे योग्य नाही. आम्हाला कुणाच्या कुटुंबीयांबाबत बोलायचं नाही, असं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले होते सोमय्या?
किरीट सोमय्या यांनी मीडियाशी बोलताना मोठा बॉम्बगोळा टाकला होता. अजित पवारांची एक हजार 55 कोटींची बेनामी संपत्ती जप्त झाली आहे. पुढे बघा काय होतं ते. अजित पवारांचा मुलगा जय अजित पवार याचे कारनामे उघड करणार आहे. तो जेलमध्ये जाणार, असा खळबळजनक दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पक्ष वाढवण्याचा अधिकार
आज मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडी असली तरी प्रत्येकाला आपला पक्षाला वाढवण्याचा अधिकार आहे. यापूर्वीही आघाडीचे सरकार होते तेव्हा काँग्रेसचे लोक आमच्याकडे यायचे, आमचे त्यांच्याकडे जायचे, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रपती काय बोलले ते सर्वांनी ऐकलं
टिपू सुलतान यांच्या नावावरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टिपू सुलतान यांच्याबद्दल राष्ट्रपती काय बोलले आहेत ते सगळ्यांनी ऐकलं आहे. निवडणुका जवळ आल्या की समाजासमाजात तेढ निर्माण करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची असं काम काही पक्ष करत आहेत. आपले राज्य पुरोगामी आहे. जे टीका करतात त्यांनीही टिपू सुलतान यांचं नाव एका रस्त्याला दिल्याचं महापौरांनी काल सांगितलं, असा टोला त्यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर – गिरीश महाजन
Wine in Maharashtra: किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय