Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट, टोलेबाजी आणि सवाल-जवाब, अजित पवार यांची विधानसभेत जबरदस्त बॅटिंग
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात जबरदस्त टोलेबाजी केली. त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
मुंबई : कांद्याच्या प्रश्नाबरोबरच अधिवेशनाचा आजचा दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या (Ajit Pawar) भाषणानं चर्चेत राहिला. एसटीवरची व्हायरल जाहिरात, निवडणूक आयोग आणि भाजप नेते गिरीश महाजनांचा (Girish Mahajan) अंकल म्हणून उल्लेख करत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोले मारले. याशिवाय सत्तांतरावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Governor Bhagat Singh Koshyari) अजित पवारांना काय सांगितलं होतं? तेही अजित पवारांनी सांगितलं.
गेल्या अधिवेशनाप्रमाणे यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी टोलेबाजी केली. खासकरुन पवारांच्या निशाण्यावर होते मंत्री गिरिश महाजन. कामकाजावर टीका करताना गिरीश महाजनांचा काका म्हणून उल्लेख पवारांनी केला. काचा तुटलेल्या एसटीवर सरकारच्या जाहिरातीचा फोटो व्हायरल होतोय. तोच फोटो दाखवून अजित पवारांनी सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका केली.
साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा-चिंचवडच्या निवडणुकीवरुनही अजित पवारांनी सत्ताधार्यांवर आरोप केले. दरम्यान निकालाबद्दल अजित पवार यांनी भूमिका मांडली. कसब्याच्या निवडणुकीवर आपण निकालानंतर बोलू, असं पवार म्हणाले. एमपीएससी परीक्षेबद्दल मुख्यमंत्री शिंदेंकडून अनावधानानं एमपीएससी आयोगाऐवजी निवडणूक आयोगाचा उल्लेख झाला होता. तो मुद्दा सभागृहात शिंदे आणि पवारांनी मांडला.
मंत्र्यांच्या शेऱ्यानंतरही अधिकाऱ्यांनी कायद्याची बाजू तपासून घ्यावी या धोरणालाही अजित पवारांनी टीका केली. त्याचबरोबर संभाराजेंना स्वराज्यरक्षक म्हणण्यावरुन जो वाद झाला होता त्याला अजित पवारांनी सरकारच्याच एका पुरवणीचा दाखला दिला.