युतीत खातेवाटपाचा तिढा, शिवसेनेत धुसफूस, पण अजित पवार यांना ‘हेच’ मलाईदार खातं मिळणार
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये धुसफूस असल्याची बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या गटाला सर्व चांगली खाती मिळतील, अशी शिंदे गटाच्या आमदारांना भीती आहे. त्यातून खातेवाटपात तिढा निर्माण झालेला. त्यानंतर आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मंत्रालयावरचा तिढा सुटल्याचे संकेत मिळत आहे. अजित पवार यांना अर्थ मंत्रालय मिळणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार यांना अर्थ खातं दिलं जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे यासाठी शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीदेखील भेट घेतल्याची माहिती समोर आली. पण त्यानंतरसुद्धा आता अजित पवार यांना अर्थ खातं दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थ खातं हे सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पण ते आता अजित पवार यांना दिलं जाणार आहे.
महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं. त्यानंतर आता सुद्धा अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं दिलं जाणार, अशी माहिती समोर आली आहे. मविआ सरकारच्या काळात अजित पवार विकास कामांसाठी निधी देत नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांची होती. याच तक्रारीतून पुढे शिवसेना पक्षात फूट पडली. पण आता पुन्हा अजित पवार यांच्याचकडे हे खातं जाताना दिसत आहे.
अजित पवार यांच्या शपथविधीमुळे शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस
अजित पवार यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्या शपथविधीमुळे सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या आमदारांमध्ये धुसफूस सुरु झाल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्या गटाला आता महत्त्वाची खाती मिळणार, अशी भीती शिवसेना आमदारांमध्ये आहे.
विशेष म्हणजे मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडलेला आहे. या विस्तारात शिवसेनेच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण असं असताना आता राष्ट्रवादी पक्षाचा एक गट पक्षात सहभागी झाल्याने शिवसेनेच्या काही आमदारांची मंत्रिपदाची इच्छा अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
आधी अजित पवार यांना महसूल खातं मिळणार असल्याची चर्चा
दुसरीकडे शिंदे गटाचा अजित पवार यांच्या अर्थ खात्याला वाढता विरोध लक्षात घेता त्यांना महसूल खातं दिलं जाईल, अशी माहिती सकाळी सूत्रांकडून मिळाली होती. पण सध्या हे खातं भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून हे खातं घेऊन अजित पवार यांच्याकडे दिल्यास विखे पाटील यांचं मंत्रिमंडळातील वजन कमी होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली. पण आता अजित पवार यांना अर्थ खातंच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीला मिळणारी संभाव्य खाती
अजित पवार – अर्थ/महसूल खातं दिलीप वळसे पाटील – सांस्ंकृतिक आणि कृषी हसन मुश्रीफ – अल्पसंख्याक आणि कामगार छगन भुजबळ – ओबीसा आणि बहुजन विकास धनंजय मुंडे – सामाजिक न्याय अदिती तटकरे – महिला व बाल कल्याण धर्मराव आत्राम – आदिवासी विकास संजय बनसोडे – क्रीडा आणि युवक कल्याण अनिल पाटील – अन्न व नागरी पुरवठा
शिवसेना राष्ट्रवादीत खातेवाटपावरुन रस्सीखेच
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खातेवाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अर्थ, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम खातं राष्ट्रवादीला देऊ नका, अशी आग्रहाची मागणी शिंदे गटाच्या आमदारांची आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली आहे.