रुपालीताई धडाकेबाज, डॅशिंग नेत्या, पण…; अजित पवारांची पहिलीच प्रतिक्रिया
मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपालीताई पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबई: मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपालीताई पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रुपालीताई डॅशिंग आणि आक्रमक नेत्या आहेत. पण आज त्यांच्यासह फक्त दहा महिलांनाच आज पक्षात प्रवेश दिला आहे. पुढील काळात पुण्यात मोठा मेळावा घेऊन इतरांनाही पक्षात प्रवेश दिला जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. रुपालीताई पाटील ठोंबरे या आक्रमक नेत्या आहेत. त्यांनीही पक्षात प्रवेश केला. त्या मनसेत अतिशय चांगलं काम करत होत्या. आज त्यांच्यासह दहा महिलांना पक्षात प्रवेश देण्यात आला. मी पक्षप्रवेशाला मी उपस्थित होतो. पुण्यात मोठा मेळावा घेऊ. त्यावेळी इतरांनाही पक्षात प्रवेश देऊ, असं अजितदादा म्हणाले.
राष्ट्रवादीची ताकद वाढेल
रुपाली ताईंची कामाची पद्धत चांगली आहे. त्यांचं काम पुणे शहराला माहीत आहे. त्यांचा नाव लौकीक आहे. हातात घेतलेलं कोणतंही काम त्या तडीस नेतात. त्यांच्या प्रवेशामुळे शहरात-जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी मदत होणार आहे. त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे. त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली
राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचेही अजित पवार यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत शरद पवारांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ओबीसींना अधिकार मिळायलाच हवा
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. या निवडणुका पुढे ढाकल्या जाव्यात. तीन एक महिन्यात म्हणजे मार्च अखेरपर्यंत हा डेटा द्यावा. तो दिल्यानंतर एप्रिलमध्येही निवडणुका घेतल्या तरी चालतील. राज्यात ओबीसी 54 टक्के आहे. त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे. पण शेवटी आम्ही वकिलामार्फत जे काही काम करायचं ते केलं. आता जानेवारीत तारीख ठेवली आहे. तोपर्यंत डेटा मिळवण्याचां काम गतीने करू. आयोगाला सर्व सुविधा देऊ. डेटा मिळाल्यानंतर सर्वातून मार्ग काढू अशी परिस्थिती दिसते, असं ते म्हणाले.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 16 December 2021#FastNews #News #Headline pic.twitter.com/thkb3QA8qV
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2021
संबंधित बातम्या:
पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच योग्य वेळ, मोदींनी काय केले अल्पभूधारक शेतकऱ्यांना आवाहन
Bailgada Sharyat | बैलगाडा शर्यतींची परंपरा स्पेनमधून महाराष्ट्रात कशी आली? जाणून घ्या रंजक गोष्ट