‘माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत’, अक्षय शिंदेच्या वकिलाचा खळबळजनक दावा
आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने एन्काऊंटरशी संबंधित काही प्रश्न उस्थित केले. तसेच अक्षय शिंदे याच्या वकिलांनादेखील एका गोष्टीवरुन झापलं. या सुनावणीनंतर अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी धक्कादायक माहिती दिली.
बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील आणि अक्षय शिंदेचे वकील दोघांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने देखील दोन्ही वकिलांना काय मुद्द्यांवरुन सुनावलं. त्यामुळे आजच्या सुनावणीत चांगलीच खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं. या सुनावणीनंतर अक्षय शिंदे याची बाजू मांडणारे वकील अमित कटारनवरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खळबळजनक दावा केला. “माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचे धमक्या येत आहेत”, अशी धक्कादायक माहिती वकील अमित कटारनवरे यांनी दिली.
अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे नेमकं काय म्हणाले?
“कोर्टाने जे सवाल उपस्थित केले तुम्ही ते ऐकले तर त्या विषयावर मी काही बोलणार नाही. 18 नोव्हेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे याच्या पत्नीने आणि त्याच्या विरोधात झालेल्या सर्व एम्पायर आणि चार्जशीट आम्हाला देण्याचे आदेश दिले आहेत. बॉटल वरती फिंगरप्रिंटचा विषय संदर्भात देखील मी काही बोलणार नाही. पण मला काय बोलायचं आणि किती बोलायचं हे मला नवीन कोर्टाकडून आज शिकायला मिळालं”, असं वकील अमित कटारवनवरे यांनी सांगितलं.
“आम्हाला सिक्युरिटी मिळावी या संदर्भात कोर्टाने आदेश दिले आहेत. आम्हाला सतत धमक्या सुरू आहेत. माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचे धमक्या येत आहे”, अशी धक्कादायक माहिती वकील अमित कटारनवरे यांनी दिली. “या संपूर्ण प्रकरणात राजकीय वास आहे हे दिसत आहे. मात्र या विषयावर आता बोलणं घाईचं होईल. हे सर्व प्रकरण न्यायालयात आल्यानंतर आता सर्वांना अटक होत आहे आणि अक्षय शिंदे याची अंत्ययात्रा देखील न्यायालयामुळेच झाली. दोन आरोपींना अटक झाली. ती अटक कर्जत मधूनच झाली. त्यांना माहिती पडलं की आता अटकपूर्व जामीन शक्य नाही. त्यामुळे हा राजकीय खेळ करण्यात आला”, असा आरोप वकील अमित कटारनवरे यांनी केला.
कोर्टात काय घडलं?
दरम्याम, मुंबई हायकोर्टाने आज सरकारी वकिलांना अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरच्या प्रकरणावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले. अक्षय शिंदे याला बेड्या ठोकल्या होत्या. पण त्याला पाण्याची तहान लागली. त्यामुळे पाणी पिण्यासाठी पोलिसांनी त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या होत्या. पण त्यावेळी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या कंबरेला असलेली बंदूक काढून गोळीबार केला, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. त्यावर कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी कोर्टाने अक्षय शिंदे याच्या वकिलांनादेखील सुनावलं. “एन्काऊंटर झालं त्यावर आता सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत, पण तुम्ही प्रसिद्धीकरिता बाहेर जाऊन एन्काऊंटरच्या घटनास्थळी तपास कसे करू शकता का?” अशा शब्दांत न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना सुनावलं.
अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? ती गोळी नेमकी कुठे गेली? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरलं होत? चार गोळ्या झाडल्या ना? मग चार बुलेट शेल आहेत का? आणि दोन बंदुकीतून जर ४ गोळ्या झाडल्या तर मग २ वेगळे बुलेट शेल आहेत का? बंदुकीचे फिंगर प्रिंट बदलण्यात आले आहेत का? असे अनेक प्रश्न न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर सरकारी वकिलांनी “ती गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली. तसेच त्याला पाणी पिण्यासाठी जी पाण्याची बॉटल दिली होती, ती सापडली आहे”, असा युक्तीवाद केला.