मुंबई : मुलुंडमध्ये फुकटात फरसाण दिलं नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्यानं एका फरसाण विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप झालाय. फरसाण दुकानाच्या मालकानं याबाबत तक्रार केलीय. सचिन पाटील असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. मुलुंडच्या इंद्रप्रस्थ विभागात ही घटना घडली.
फरसाण दुकानाचा मालक सुनील चौधरी यांनी सांगितलं, “पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी साडेचार हजार रुपयांचं फरसाण आपल्याकडे मागितलं होतं. ते फरसाण त्यांना दिलं नाही याचा राग मनात ठेवून त्यांनी विकेंड लॉकडाऊनचं कारण काढत दुकानात घुसून हेतू पुरस्कर आपल्या कर्मचाऱ्याला मारहाण केलीय.” विक्रेत्याच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याचा माहितीही दुकान मालकाने दिलीय. याबाबत मुलुंड पोलिसांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास टाळा टाळ केली आहे.
VIDEO : मुंबईत फुकटात फरसाण न दिल्यानं पोलीस अधिकाऱ्याकडून विक्रेत्याला मारहाणीचा आरोप, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल@OfficeofUT @CMOMaharashtra @Dwalsepatil @MumbaiPolice pic.twitter.com/BU9qKOnToA
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 15, 2021
दरम्यान, रविवारी (11 जुलै) संध्याकाळच्या सुमारास फरसाणचे दुकान अर्धवट उघडे असताना त्या ठिकाणी मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील पोहोचले. त्यांनी दुकानात काम करणाऱ्या कामगारांना दुकान का उघडे ठेवले असे विचारत त्याला मारहाण केली. त्याला थेट पोलीस ठाण्यात नेऊन त्या ठिकाणी देखील बेदम मारहाण केली. या घटनेमध्ये या कामगाराच्या कानाला दुखापत झाल्याचाही माहिती मिळाली आहे. प्रकाश चौधरी असं मारहाण झालेल्या दुकानदाराचं नाव आहे.
या घटनेसंदर्भात परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याकडे दुकानाच्या मालकाकडून पोलीस अधिकारी सचिन पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.