निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला…नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला
Bahujan Vikas Aaghadi: माझ्याकडे तीच माहिती. तावडेंची माहिती महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिली. तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. हा बहुजन समाजाचा चेहरा आहे. राष्ट्रीय महासचिव आहे. राज्यांची काही सूत्रे आहेत. मोदी आणि शाह यांच्या जवळचा माणूस आहे. त्यांना पकडून देण्यासाठीच भाजपमध्येच कारस्थान झालं, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नालासोपारात भाजप आणि बहुजन विकास आघाडीत निर्माण झालेला राडाचे पडसाद उमटू लागले आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. त्यावर आता शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले संजय राऊत
भाजपने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं ते कॅमेऱ्यासमोर आहे. खुलासे कसले करता. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. बहुजन विकास आघाडीचे लोकं घुसले. त्यांनी पैसे जप्त केले. पैसे फेकले तोंडावर. त्यांनी तावडेंना कोंडून ठेवलं. यावर भाजप काय खुलासा करणार आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
प्रत्येक मतदार संघात १५ ते २० कोटी रुपये
निवडणुकीत आचारसंहिता लागू होण्याआधी १५ ते २० कोटी रुपये प्रत्येक मतदारसंघात पोहोचले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, नाशिकला हॉटेलमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे पैसे पकडले. मुंबईत ठाण्यातून पैसे वाटपासाठी खास माणसांच्या नेमणुका झाल्या आहे. राम रेपाळे नावाचा शिंदेचा माणूस आहे. तो रात्री ११ नंतर पैसे घेऊन येतो. पैशाचं वाटप करून तो परत पोलीस बंदोबस्तात जातो. राम रेपाळे हे नाव लक्षात ठेवा. २३ तारखे नंतर त्याचं काय करायचं ते आम्ही पाहू. अशा १८ लोकांची नावे माझ्याकडे आहेत. पण विनोद तावडे स्वत: पैसे वाटतात हे आश्चर्य आहे. आमच्या बॅगा तपासतात. खिसे तपासतात. त्यांचं काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
तावडेंकडे १५ कोटीपेक्षा जास्त रक्कम होती असं ऐकलं. त्यातील ५ कोटी रुपये स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर यांच्या ताब्यात आहेत असं मी ऐकलं. त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सत्ताधारी पक्ष कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे हे कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे, असे राऊत यांनी म्हटले.