मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. महापुरुषांचा वांरवार अवमान केल्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात जनक्षोभ होता. त्यांच्या विरोधात मोर्चेही काढण्यात आले होते. त्यांचे पुतळेही जाळण्यात आले होते. त्याची दखल घेत केंद्र सरकारने अखेर राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची घाण गेली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही टीका केली आहे. राज्यपालांनी आधीच जायला हवं होतं. ते वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक विधान करत होते. मराठी माणसांच्या विरोधातही त्यांनी विधाने केली होती. महाराष्ट्राचा अवमान करण्यासाठीच राज्यपालांना पाठवलं होतं की काय अशी परिस्थिती होती, असं अंबादास दानवे म्हणाले.
आम्ही मोर्चाही काढला होता. अधिवेशनात आवाजही उठवला होता. भाजपने म्हणावं किंवा केंद्राने महाराष्ट्राचा अवमान करण्यासाठी, जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावण्यासाठी लोकांचं जनमत असतानाही त्यांना जास्त दिवस ठेवलं. पण त्यात आता त्यांनी दुरुस्ती केली आहे. मी त्यांचे आभारही मानणार नाही आणि अभिनंदनही करणार नाही. खरं तर महाराष्ट्रातील घाण गेली असंच म्हणेल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
राज्यपालांचा राजीनामा झाला आहे अतिशय आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालाचा राष्ट्रपतींनी राजीनामा मंजूर केला हे बरं झालं. राज्यपाल राष्ट्रपुरुषांच्याबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होते. आता नवीन राज्यपाल आले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.
उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली.. महाविकास आघाडी च्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 12, 2023
महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह कोश्यारी आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.