मुंबईतील 161 पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली
संवेदनशील ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याने ऐन निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भिती वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच मुंबईतील 161 पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. मुंबईसह नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई विरार येथील तब्बल 221 पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
अशा प्रकारे तडकाफडकी बदली केल्याने पोलीस निरिक्षकांमध्ये नाराजी आहे. अनेक पोलीस निरीक्षक या निर्णयाविरोधात MAT मध्ये दाद मागण्याच्या तयारीत आहेत. संवेदनशील ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याने ऐन निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भिती वर्तवली जात आहे.
अनेक पदे अद्याप रिक्त का?
4 ऑक्टोंबरला देखील मुंबईतून 111 पोलीस अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करण्यात आली होती. त्यातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याची माहिती आहे. अनेक पोलीस निरीक्षक मुंबईत येण्यास अनुत्सुक आहेत. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.