अमित शाह यांनी ठरवून शिवसेना फोडली, कारण त्यांचे… संजय राऊत यांचा गंभीर आरोप काय?
Sanjay Raut Reaction on Amit Shah : शिवसेना फुटल्याची सल शिवसैनिकांच्या कायम मनात सलत राहणारी आहे. शिवसैनिक कोणत्याही गोटात असला तरी शिवसेनेची फूट ही त्याची दुखरी बाजू आहे. आज खासदार संजय राऊत यांनी त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरले आहे.

शिवसेना ही अनेकांसाठी धमन्यातील रक्त आहे. अनेक हाडाचे शिवसैनिक, दुफळीने अस्वस्थ आहेत. शिवसेना फुटल्याची सल शिवसैनिकांच्या कायम मनात सलत राहते. शिवसैनिक कोणत्याही गोटात असला तरी शिवसेनेची फूट ही त्याची दुखरी बाजू आहे. आज खासदार संजय राऊत यांनी त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी शाह यांनी शिवसेना का फोडली याचं कारण ही स्पष्ट केले आहे.
अमित शाह यांच्यावर फोडले खापर
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना फुटीचे खापर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर फोडले आहे. आम्ही २५ वर्ष अत्यंत चांगलं काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही उत्तम काम केलं. पण सर्वांना माहीत आहे. दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आलं, असा घणाघात त्यांनी घातला. चंद्रकांत पाटील यांनी युती होण्याविषयीच ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याबद्दल त्यांनी आभार मानले.




भाजपभाईंमुळे महाविकास आघाडीत
आम्ही महाविकास आघाडीत गेलो त्याला कारण भाजपच्या काही लोकांचा हट्ट होता, असे राऊत म्हणाले. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत आलो. २५ वर्षाची आमची युती, त्या कारणासाठी तुटली तर ती कारणं पाहिली तर आमची भूमिका योग्य होती. जे आम्ही मागत होतो, जो आमचा हक्क होता, ते तुम्ही आमचा पक्ष फोडल्यानंतर एकनाथ शिंदेंना दिले, अशी टीका राऊतांनी केली.
मुंबईतील आर्थिक हितसंबंधामुळे शिवसेनेत फूट
आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रीपदाचा दावा आणि हक्क एकनाथ शिंदेंना दिला. निवडणुकीनंतरही तुमच्या सरकारमध्ये शिवसेना आहे. पण ती डुप्लिकेट शिवसेना आहे, असा दावा राऊतांनी केला. आमचा जो दावा, मागणी जी चर्चेत होती ती अमित शाह यांनी नाकारली. अमित शाह यांनी ठरवून केलं. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती. त्यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत गुंतले होते. म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडून संपवायची होती. आजही एकनाथ शिंदेंचा वापर त्यासाठीच सुरू असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला.
भाजपाच्या मनात खोट होती
भाजपचे नेते आमच्या संपर्कात. संघाचे नेते आमच्या संपर्कात. आमची चर्चा होते. युती तुटल्याचं त्यांना दु:ख आहे. आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. आम्हाला उपमुख्यमंत्रीपदही दिलं नाही. कारण भाजपच्या मनात खोट होती, असा घणाघात राऊतांनी घातला. खासकरून अमित शाह याच्या मनात खोट होती. त्यांना आमची पार्टी फोडायची होती. अमित शाह यांनी होऊ दिलं नाही. कारण त्यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत होते. मात्र शिवसेना असेपर्यंत ते होणार नव्हतं, असा आरोप राऊत यांनी केला.
चंद्रकांत पाटील युतीचे समर्थक
चंद्रकांत दादा हे शिवसेना भाजप युतीचे पहिल्यापासून समर्थक राहिले आहे. शिवसेना भाजप युतीची जी जुनी पिढी होती. ज्यांनी एकत्र काम केले त्यात चंद्रकांतदादा होते. आता जे भाजपात हौशे नवशे गवशे बाहेरून आले आहेत. त्यांना २५ वर्षातील आमच्या युतीचं महत्त्व समजणार नाही. या हवशे नवशे आणि गवशांचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. पण चंद्रकांत पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत, असे राऊत म्हणाले.