संजय राऊत यांचा अमित शाह यांच्यावर सर्वात मोठा आरोप; म्हणाले, एकनाथ शिंदे नव्हे, शाह यांनीच…
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी युती तोडण्यापासून ते शिवसेना फोडण्यापासूनचे भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यातही राऊत यांनी भाजप नेते अमित शाह यांना टार्गेट केलं आहे. शाह यांनीच शिवसेना फोडल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आणि शिवसेना फुटणं याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही. भाजपचे नेते अमित शाह आणि दिल्लीतील भाजप नेत्यांनीच शिवसेना फोडली आहे. मुंबईचा ताबा घेण्यासाठी आणि मुंबईवरील मराठी माणसाचं वर्चस्व कमी करण्यासाठीच अमित शाह यांनी शिवसेना फोडल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना राऊत यांनी हा आरोप केला. विशेष म्हणजे अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यापार्श्वभूमीवर राऊत यांनी हा बॉम्ब टाकला आहे.
शिवसेनेसारखा पक्ष फोडणं आणि शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करणं, मुंबईवर शिवसेनेची आणि मराठी माणसाची पकड ढिली करणं हे भाजपचं गेल्या अनेक वर्षापासूनचं टास्क आहे. ते त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करायचं असेल तर शिवसेना फोडली पाहिजे, हे त्यांच्या मनात होतं. पण शिवसेना अशी फुटू शकत नाही हेही त्यांना माहीत होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह पाच सहा लोकांचा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. पण त्यांची ताकद पाच ते सहा आमदारांपेक्षा अधिक नसावी. पण नंतर जे चित्र तयार झालं. ते करण्यात भाजपचं दिल्लीचं नेतृत्व आघाडीवर होतं. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव करून हा पक्ष फोडण्यात आला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
तपास यंत्रणांचा वापर
इतक्या मोठ्या संख्येने आमदार गेले. त्यातील 12 ते 13 आमदारांवर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे खटले सुरू होते. अनेक खासदारांवर खटले सुरू होते. त्याचा वापर करून अमित शाह यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष फोडण्यात आला. कारण महाराष्ट्रातून शिवसेना कमजोर करणं, मुंबईवर ताबा मिळवणं हे त्यांचं टार्गेट होतं. त्यांचं वारंवार मुंबईवर ताबा घेऊ हे सुरू झालं आहे, तो त्या षडयंत्राचाच भाग आहे. मुंबईवरील मराठी माणसाचं वर्चस्व नष्ट करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर सुरू केला. हे अमित शाह याचं राजकारण होतं, असा आरोप राऊत यांनी केला.
भाजप शिंदे गट संपवणार
शिवसेना फोडल्यानंतरच महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जायला लागले. महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज कमजोर झाला. एकनाथ शिंदे यांच्यावरही ईडीचा दबाव आला. उद्धव ठाकरेंसमोर शिंदे कसे रडले हे मलाही माहीत आहे. आमचं म्हणणं होतं आपण खंबीर राहिलं पाहिजे. हे ही दिवस निघून जातील. आपण घाबरता कामा नये. पण आता हे लोक मोठा आव आणत आहेत. डरकाळी फोडत आहेत. गर्जना करत आहेत. पण त्यांच्या या पोकळ गर्जना आहेत. भविष्यात भाजप यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात झाली आहे. भाजपला महाराष्ट्राचा आवाज उठवणारा पक्ष आणि संघटना नकोय, असंही ते म्हणाले.
युती भाजपनेच तोडली
यावेळी त्यांनी भाजपनेच युती तोडल्याचा दावा केला. भाजपने त्यांचं वचन निभावलं नाही. 2014मध्ये भाजपनेच युती तोडली. आम्ही तोडली नव्हती. युती तोडल्याचं स्वत: एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं होतं. खडसे तेव्हा भाजपमध्ये होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.