केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे मुंबईत निधन

| Updated on: Jan 15, 2024 | 4:20 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहीण राजेश्वरीबेन शाह यांचं निधन झालं आहे. राजेश्वरीबेन शाह यांच्यावर मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे मुंबईत निधन
Follow us on

मुंबई | 15 जानेवारी 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मोठ्या बहीण राजेश्वरीबेन शाह यांचं निधन झालं आहे. राजेश्वरीबेन शाह यांच्यावर मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. राजेश्वरीबेन यांच्या फुप्फुसांचं काही महिन्यांपूर्वी ट्रान्सप्लान्ट झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर एचएन रुग्णालयात उपचार सुरु होते. राजेश्वरीबेन यांच्या मृत्यूनंतर अमित शाह यांचे गुजरातमधील नियोजित पुढच्या दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश्वरीबेन यांच्या निधनानंतर शाह कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत राजेश्वरीबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भगिनी श्रीमती राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांचे जाणे हे समस्त शाह कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमितभाई आणि समस्त शाह कुटूंबियांना मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. राजेश्वरीबेन शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडूनही संवेदना व्यक्त

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील राजेश्वरीबेन शाह यांना ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या आहेत. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या थोरली बहीण राजेश्वरीबेन यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रुजूबेन अशी त्यांची सर्वत्र ओळख होती. भाऊ -बहिण या नात्याची व्याख्या करताच येत नाही. हे नातं सगळ्या नात्यांच्या पलीकडचं! अमितभाईंसाठी ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. याप्रसंगी मी शाह कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. राजेश्वरीबेन यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली. अमितभाई आणि शाह कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांति!”, असं चंद्रशेखर बावनकुळे ट्विटरवर म्हणाले आहेत.