अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित, नेमकं कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. पण हा दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे.
मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह येत्या 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांची 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडणार होती. त्यासाठी जय्यत तयारीदेखील सुरु होती. पण त्यांचा 15 फेब्रुवारीचा दौरा अचानक स्थगित करण्यात आला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं होतं. प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना आणि काळजी घेतली जात होती. पण त्यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांआधीच त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यांचा दौरा स्थगित होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
अमित शाह यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते अशोक चव्हाण यांचा भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. पण त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आजच पार पडला आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाकडून अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याबाबत दुजोरा
विशेष म्हणजे अमित शाह त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमातही हजेरी लावणार होते. जळगावत युवा संमेलन कार्यक्रमासाठी भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांची उपस्थिती राहणार होती. अमित शाह यांचा 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. मात्र अमित शाह यांचा हा जळगाव जिल्ह्याचा दौरा रद्द झाला आहे. खाजगी कारणांमुळे हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अमित शाह यांचा दौरा स्थगित झाल्याच्या बातमीला जिल्हा प्रशासनाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. अमित शाह पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा सुद्धा स्थगित झालाय. त्यामुळे आता अमित शहा यांचा पुढील दौरा कधी होतो याकडे लक्ष लागलं आहे.