Amit Shah | ‘सागर’ बंगल्यावर खलबतं, महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा निर्णय होणार?
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडलीय. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकाणातील मोठी बातमी समोर आलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज लालबागच्या राजाच्या दर्शनानिमित्ताने मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याआधी त्यांनी वांद्रे येथील भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावरील बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी गेले.
अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ‘सागर’ बंगल्यावर महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
बैठकीत नेमकी चर्चा काय?
या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज, धनगर समाज आक्रमक झालाय. तसेच ओबीसी समाजही आक्रमक झालाय. याशिवाय राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्र प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घडामोडी वेगाने घडत आहेत. नार्वेकर नुकतंच दिल्लीला जावून कायदेतज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आले. त्यानंतर आता अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय?
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस अनेकदा दिल्लीला चर्चेसाठी जावून आले आहेत. आता चर्चा अंतिम टप्प्यावर आल्याची माहिती आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबतच्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, अमित शाह आज फक्त काही तासांसाठी मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. ते फडणवीस यांच्या निवासस्थानावरील बैठक आटोपल्यानंतर मुंबई विद्यापीठातील कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर ते मुंबई विमानतळावर जावून दिल्लीच्या दिशेला रवाना होतील.