मोठी बातमी ! अमित शाह अचानक मुंबईत, थेट रुग्णालयात धाव; जवळच्या व्यक्तीवर उपचार
भाजपचे नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अचानक मुंबईत आले आहेत. शाह यांचा हा खासगी दौरा आहे. या दौऱ्यात ते कुणाच्याही गाठीभेटी घेणार नाहीत. कोणतीही मिटिंग घेणार नाहीत. अमित शाह यांची बहीण मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या बहिणीवर या रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यामुळे बहिणीला भेटायला ते आज मुंबईत आले.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, 7 जानेवारी 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अचानक मुंबईत आले आहेत. अमित शाह यांच्या बहिणीवर मुंबईत एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहिणीची विचारपूस करण्यासाठी अमित शाह थेट मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी बहिणीची भेट घेतली. अमित शाह मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा रुग्णालयात आले. यावेळी त्यांनीही शाह यांच्या बहिणीच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रात्री साडे नऊच्या सुमारास अचानक मुंबईत आले. मुंबईत येताच त्यांनी थेट एचएन रिलायन्स रुग्णालय गाठलं. या रुग्णालयात अमित शाह यांची बहीण उपचार घेत आहे. यावेळी अमित शाह यांनी बहिणीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशीही चर्चा करून उपचाराबाबतची माहिती घेतली. अमित शाह यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईक होते. तब्बल पावणे दोन तास ते बहिणीसोबत होते. हा त्यांचा खासगी दौरा होता.
मुख्यमंत्री आणि अंबानी रुग्णालयात
अमित शाह मुंबईत आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रिलायन्स रुग्णालयात आले. मुख्यमंत्री शिंदेही 15 ते 20 मिनिटं रुग्णालयात होते. त्यांनीही शाह यांच्या बहिणीची भेट घेऊन विचारपूस केली. शिंदे यांनी डॉक्टरांशीही चर्चा करून उपचाराची माहिती घेतली. अमित शाह मुंबईत आल्याचं कळताच रुग्णालयाभोवती पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात धाव घेतली होती. उद्योगपती मुकेश अंबानीही रुग्णालयात उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
खासगी दौरा
अमित शाह यांचा हा खासगी दौरा होता. या भेटीनंतर शाह पुन्हा थेट दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. ते कुणाचीही भेट घेणार नाहीत. कोणतीही मिटिंग करणार नाहीत. बहिणीची विचारपूस करून ते थेट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाह यांचा हा दौरा पूर्णपणे खासगी असल्याने भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना त्याची माहिती देण्यात आली नव्हती. रुग्णालयाबाहेर गर्दी होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.