विधानसभेपूर्वी भाजपमध्ये अभूतपूर्व हालचालींचे संकेत, अमित शाह महाराष्ट्रात येणार, कोण कुणावर राजकीय कुरघोडी करणार?
महाराष्ट्रात भाजपला लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपच्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकून येतील, असा अंदाज भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांचा होता. पण महाराष्ट्राच्या जनतेने भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला मतदानाचा माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं. लोकसभेत झालेल्या हानीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी भाजप नेते जंगजंग पछाडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता महाराष्ट्रात भाजपची पुन्हा सत्तेची घडी बसवण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात आगामी काळात मोठ्या उंचीच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या घाडमोडींमधून कोण कुणावर राजकीय कुरघोडी करणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच. पण अमित शाह यांच्या 'चाणक्य'नीतीमध्ये भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांना मोलाची जबाबदारी मिळते? ते पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रातील भाजपचे दिग्गज नेते अमित शाह हे विशेष लक्ष देणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्याला उपमुख्यमंत्रीपदापासून मुक्त करावं, अशी मागणीदेखील पक्षश्रेष्ठींकडे केली. या दरम्यान भाजपचं दिल्लीतलं हायकमांड हे केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या कामात व्यस्त होतं. पण आता दिल्लीतलं भाजपचं हायकमांड महाराष्ट्रात विशेष लक्ष देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे भाजपचे केंद्रातले ‘चाणक्य’ नेते तथा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी फार महत्त्वाच्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह राज्यातल्या विधानसभा निवडणुकीआधीच अॅक्शन मोडवर आले आहेत. अमित शाह हे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा यांच्या या दौऱ्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
विधान परिषदेसाठी भाजपकडून 11 नावांचा विचार
भाजपच्या गोटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पुढच्या महिन्यात 13 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नेत्यांच्या नावाचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, रासप नेते महादेव जानकर यांना विधान परिषदेसाठी भाजपकडून संधी देण्याबाबतची चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत ओबीसी, मराठा, धनगर असं जातीय समीकरण असणार आहे. पाच जागांमध्ये एका महिलेला संधी मिळणार हे निश्चित आहे. जातीय समीकरणे पाहून उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.
फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर उद्या महत्त्वाची बैठक
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी उद्या संध्याकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव यांच्यासह सह प्रभारी अश्विनी वैष्णव देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र भाजपच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे.