Amol Mitkari : मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का? त्याचीच आधी चौकशी करा, अमोल मिटकरी यांची सडकून टीका
राष्ट्रवादीत मोठा-छोटा असे काही नसते. राष्ट्रवादी हा एक परिवार आहे. मोहित कंबोजने पत्रकार परिषद घ्यावी, हा त्याचा अधिकार आहे. मात्र वातावरण खराब करू नये, असे अमोल मिटकरी म्हणाले.
मुंबई : मोहित कंबोज (Mohit Kamboj) हा कुणी तत्ववेत्ता किंवा भविष्यकार नाही. हा प्रेस कॉन्फरन्स घेणार, काहीतरी जुने घोटाळे काढणार आणि महाराष्ट्राचे वातावरण खराब करणार, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सकाळी ट्विट करत राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यासंबंधी विचारले असता अमोल मिटकरी यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे. आजच्या अधिवेशनातील (Assembly session) प्रश्न वेगळे आणि महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पुरामुळे अतोनात नुकसान झाले, भंडाऱ्यात दुर्दैवी घटना घडली त्यावर हा महाशय बोलत नाही, मात्र अधिवेशनाच्या तोंडावर वातावरण खराब करणे, हा मोहित कंबोजचा धंदा आहे, अशी सडकून टीका मिटकरी यांनी केली आहे.
‘हा भाजपाचा भोंगा’
मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. हा भाजपाचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाही, असा सवाल करत मोहित कंबोजचीदेखील चौकशी झाली पाहिजे. ईडी कुठे धाड टाकत आहे, हे जर त्याला माहीत असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का, असा संतप्त सवाल करत त्याच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
‘राष्ट्रवादी एक परिवार’
किरीट सोमैया आणि भाजपाने आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक यांचे पुढे काय झाले, याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. राष्ट्रवादीत मोठा-छोटा असे काही नसते. राष्ट्रवादी हा एक परिवार आहे. त्याने पत्रकार परिषद घ्यावी, हा त्याचा अधिकार आहे. मात्र वातावरण खराब करू नये. आमच्या सर्व आमदारांची बैठक अजित पवारांनी आज बोलावली आहे. या सरकारविरुद्ध आम्ही आक्रमक राहणार आहोत, असे ते म्हणाले. अमोल मिटकरी पुढे म्हणाले, की आज अधिवेशन होत आहे. कमी कालावधीचे हे सरकार आहे. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असे हे बोलले होते. मात्र असे काहीही झाले नाही, असा आरोप त्यांनी केला.