राज्यपालांकडून पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; अमोल मिटकरी यांच्याकडून वादग्रस्त व्हिडीओ ट्विट
नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?, असा उद्विग्न सवाल मिटकरी यांनी केला आहे.
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले दिसतात. कधी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्याने तर कधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल वादात अडकले आहेत. राज्यपाल कोश्यारी आताही नव्या वादात अडकले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने ते वादात सापडले असून त्यांच्यावर टीकाही होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा हा व्हिडीओ पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का? pic.twitter.com/B7anekQ2q0
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 7, 2023
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला एक व्हिडीओ अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यानंतर राज्यपालांच्या विधानावर संतापही व्यक्त केला आहे.
राज्यपालांचा हा व्हिडीओ 18 सेकंदाचा असून एका कार्यक्रमातील दिसत आहे. या कार्यक्रमातच राज्यपाल काही उदाहरणे देताना दिसत आहेत. ही उदाहरणे देताना त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचा फक्त शिवाजी उल्लेख करण्यात आल्याने मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे.
आजकल क्या हो गया? सब कहते हां… शिवाजी होने चाहीए… चंद्रशेखर होने चाहीए… भगतसिंह होने चाहीए… नेताजी होने चाहीए… लेकीन मेरे घर में नहीं दुसरे के घर में होने चाहीए, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. हे विधान करताना राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी असा केला. या एकेरी उल्लेखावरूनच मिटकरी यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
मिटकरी यांनी हा व्हिडीओ पोस्ट करून त्यावर कमेंटही केली आहे. राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख!
नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?, असा उद्विग्न सवाल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राज्यपालांचा हा व्हिडीओ कधीचा आहे? कोणत्या कार्यक्रमातील आहे? यावर मिटकरी यांनी काहीही भाष्य केलेलं नाही. मात्र, हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. तसेच त्यावरून प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.