Navneet Rana: राणा दाम्पत्यांना दिलासा नाहीच, 29 एप्रिलला सुनावणी; तोपर्यंत कोठडीतच मुक्काम
Navneet Rana: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नाही.
मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना आजही दिलासा मिळाला नाही. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास सत्रं न्यायालयाने नकार दिला. येत्या 29 तारखेला खार पोलिसांनी दाम्पत्यांच्या आरोपावर सविस्तर निवेदन सादर करण्याचे आदेश देत सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना येत्या 29 एप्रिलपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. येत्या 29 एप्रिल रोजी राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याने त्यांना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर वांद्रे न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. राणा यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची मागणी रिजवान मर्चंट यांनी केली. त्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विरोध केला. वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला असताना पुन्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याची गरज काय? असा सवाल करत माझा या सुनावणीला विरोध आहे, असं प्रदीप घरत यांनी कोर्टाला सांगितलं. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना येत्या 29 तारखेपर्यंत आपलं म्हणणं सविस्तर मांडण्याचे आदेश दिले.
सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव
या आधी वांद्रे कोर्टाने सरकारी वकील आणि खार पोलिसांना येत्या 27 एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यास सांगून या प्रकरणावर 29 तारखेला सुनावणी ठेवली होती. मात्र, राणा दाम्पत्याने आज सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला. परंतु, कोर्टाने खार पोलिसांना 29 तारखेपर्यंत आपलं लेखी म्हणणं मांडण्यास सांगून 29 तारखेला प्रकरणावर सुनावणी ठेवली. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.