गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. “जेव्हा नेत्यावर बंदूक ताणण्यालायक काही दिसत नाही, त्यांच्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही तेव्हा अनेकदा त्यांच्या पत्नीच्या मागे लागलं जातं. विरोधक तेच करत आहेत”, असा दावा अमृता फडणवीस यांनी केलंय. अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्यात अमृता या नृत्य करताना दिसत आहेत. याशिवाय हे गाणं त्यांनी स्वत: गायलं सुद्धा आहे. त्यांचं हे गाणं अनेकांना आवडलं आहे. अनेकांकडून त्यांचं कौतुक केलं जातंय. पण दुसरीकडे काही जणांकडून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातंय. या ट्रोलिंगवरुन अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
“जेव्हा नेत्यावर बोलता येत नाही, तेव्हा विरोधक पत्नीवर बोलतात”, अशी टीका अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर केलीय. “मलाही विरोधकांनी ट्रोल केलं. पण मी काम करत राहिली”, असं विधान अमृता यांनी केलं.
“विरोधकांनी माझं नुकतंच प्रदर्शित झालेल्या गाण्यालाही सोडलं नाही. त्यांनी माझ्या मागच्या गाण्यांच्या वेळीही मला सोडलं नव्हतं. पण ते मी समजू शकते की, ते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय क्षेत्रातील स्थानामुळे आहे. आता मला त्याची सवय झालीय. पण तेवढाच मला आनंद आहे. मी सातत्याने करत राहिली आणि लोकांचंसुद्धा सहकार्य वाढत गेलं”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.
“या गाण्याला इतके लाईक मिळत आहेत, इतक्या कमेंट येत आहेत आणि या गाण्याला पसंती दिली याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे आणि श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते”, अशा भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
“देवेंद्र फडणवीस यांनी गाणं ऐकलेलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की, या गाण्यासाठी तू ट्रोल होशील आणि ते झालंही. मी ट्रोल झाले. मात्र मला आनंद आहे की लोकांच्या पसंतीस हे गाणं पडतंय”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
“स्त्री ही एक शक्ती आहे आणि स्त्री शक्तीसाठी सुद्धा लवकरच माझे नवीन गाणं येत आहे. ते गाणं मी म्हणणार आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे गाणं मी रिलीज करणार आहे”, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिला.
“महिला इंटरप्रेनर जर पाहिले तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारच कमी आहेत. महिला फक्त 13 टक्केच आहेत आणि बाकीचे सगळे पुरुष आहेत”, असं मत अमृता यांनी व्यक्त केलं.
“स्वतःवर विश्वास ठेवला की कॉन्फिडन्स येतो. स्वतःच्या नियतीवर ज्याला विश्वास आहे त्याला कॉन्फिडन्स येतोच”, असंदेखील ते यावेळी म्हणाल्या.