‘समुद्रातील अनधिकृत मशीदचा विषय भोंग्यासारखा होऊ नये’, आनंद दवे यांचा राज ठाकरे यांना टोला
"सांगलीतील मशीद कळली पण पुण्यातील जुन्या मनसेच्या कार्यालयासमोर अशीच मशीद उभी राहत असताना मात्र कोणालाच कळल नाही", असा टोला आनंद दवे यांनी लगावला.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी टीका केलीय. समुद्रातील अनधिकृत मशीदचा विषय भोंग्यासारखा होऊ नये. दर पाडव्याला सरकारला सूचना देणं आता नको, असं आनंद दवे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांना एका वाक्याने जावेद अख्तर जवळचे वाटले. पण याआधीच्या त्यांच्या वक्तव्याचं काय? जावेद अख्तर यांच्या वाक्याचे कोणत्या मुस्लिम नेत्याने स्वागत केलं? असा सवाल आनंद दवे यांनी केला. सांगलीतील मशीद कळली पण पुण्यातील जुन्या मनसेच्या कार्यालयासमोर अशीच मशीद उभी राहत असताना मात्र कोणालाच कळल नाही, असा टोला त्यांनी लगावला.
“आजही लाऊड स्पीकर चालू असल्याचं हिंदू महासंघ सांगतच होता ते आज मान्य केलं. मध्यंतरी स्पीकर बंद झाल्याचं सांगितलं जात होत. राज ठाकरेंना देखील मुस्लिम हवेच आहेत. मग भोंग्याचं काय? अनधिकृत मशीद शेजारी मंदिर कशासाठी? त्यातून मुस्लिम समाजाचे काय नुकसान होणार आहे? त्यापेक्षा ते बांधकाम थांबवा. आणि त्यासाठी महिन्याची मुदत कशासाठी?मुस्लिम समाजाबाबत राजसाहेब थोडे मवाळ झालेत. आता भाजपला मैदान मोकळं”, अशी टीका आनंद दवे यांनी केली.
राज ठाकरे सांगलीतल्या प्रकरणाविषयी नेमकं काय म्हणाले?
पाकिस्तानात जाऊन आमच्या शहरात जो हल्ला झाला तो आम्ही विसरणार नाहीत, असं बोलणारी माणसं मला हवी आहेत. जे सांगतील चालूय तशी माणसं नकोय. मला मध्यंतरी पत्र आलं. सांगलीच्या मंगलमूर्ती कॉलनी येथे बहुतांश लोकं हिंदू राहतात. इथे मंगलमूर्ती कॉलनी वसलेली आहे. या भागात काही क्षेत्र आरक्षित आहे. पण सदर जागेबाबत बनावट कागदपत्रे तयार करुन अब्दुल, राजू शेख लोकांनी जागेवर दावा केला. विरोध केल्यास त्रास द्यायला सुरवात केली, पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही. सदर जागेत या लोकांनी मोठे पत्र लावले आहेत, असं पत्र राज ठाकरे यांनी वाचलं. मशिदीच्या दाव्यावरुन वाद अशी बातमी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावर नेमकं काय म्हणाले?
“मुख्यमंत्री तुमच्याकडे शिवसेना नाव आहे. मशिदींवरील भोंगे बंद करा. सतरा हजार मनसैकांवर या मुद्द्यावरुन दाखल झालेले गुन्हे मागे करा. एक तर तुम्ही सांगा की लाऊडस्पिकर बंद करा. नाहीतर दुर्लक्ष करा, आम्ही लाऊड स्पिकर बंद करतो. दोघांपैकी एक निर्णय शिंदे सरकारला घ्यावा लागेल. मी विषय सोडलेला नाही. मी मुद्दाम हा विषय काढला. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो महाराष्ट्रातील गोष्टींकडे लक्ष द्या”, असं राज ठाकरे म्हणाले.
“प्रशासनाचं आणि राज्यकर्त्याचं दुर्लक्ष असलं तर काय घडू शकतं, कारण सगळ्याचं राजकारणाकडे लक्ष, पण गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागात एकीकडे गेलो होतो. समोर पाहिलं तर मला समुद्रात लोकं दिसली. काय ते समजेना. मी एकाला सांगितलं की बघ रे काय ते. मग त्या माणसाने ड्रोन शूट करुन माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
“दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजी अली तयार करणार? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिश्नर, महापालिका आयुक्तांना आजच सांगतो महिन्याभरात कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाहीत. वाट्टेल ते फाजील चाळे चालणार नाही. एकदा माझ्याकडे राज्य आलं तर आख्खं राज्य सुतासारखं सरळ करेन. परत कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.