मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट घडून आलीय. या भेटीत एकनाथ शिंदे आणि अनंत अंबानी यांच्यात अर्धा तास चर्चा झालीय. ही चर्चा नेमकी कशासाठी झाली, कोणकोणते विषय या चर्तेत होते याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण त्यांच्या या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय.
मुकेश अंबानी हे देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीला जास्त महत्त्व आहे. कारण आगामी काळात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात ठेवून रिलायन्स कंपनीकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणुकीची काही घोषणा होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकनाथ शिंदे आणि अनंत अंबानी यांच्यात अशी पहिल्यांदाच भेट झालेली नाही. याआधीदेखील अनेकदा दोघांची भेट झालीय. गेल्यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात तासभर बैठक पार पडली होती. विशेष म्हणजे यावर्षी गणेशोत्सवात मुकेश अंबानी आपल्या कुटुंबियांसह वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आज अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर भेट घडून आलीय. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ठाण्यात आज (17 ऑक्टोबर) रात्री जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांची बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीच दसरा मेळावा संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. ठाण्याच्या हॉटेल टिपटॉप प्लाझामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत दसरा मेळावा विषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत.