मोठी बातमी! अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अखेर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झालाय.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून ज्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापलं होतं, अखेर त्याच पोटनिवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीदरम्यान भाजपवर उमेदवार मागे घेण्याबाबतचा दबाव वाढल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. पण या पोटनिवडणुकीच्या रणांगणात भाजप उमेदवार असता तर ही निवडणूक अटीतटीची ठरली असती. भाजपने उमेदवार मागे घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. तरीही भाजप वगळता इतर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध ना ठरता या जागेसाठी मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचाच विजय जवळपास निश्चित झालाय. ऋतुजा लटके यांना मतमोजणीच्या तेराव्या फेरी अंती 48 हजार 15 मतं मिळाली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह मोठी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं होतं. या संकट काळात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढील आव्हान वाढलं होतं.
विशेष म्हणजे ठाकरे गटाला डिवचण्यासाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आणि शिंदे गटाकडून रणनीती आखली जात होती.
काही महिन्यांपूर्वी अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झालं होतं. त्यामुळे ती जागा खाली झाली होती. नियमानुसार लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर पुढच्या सहा महिन्यात निवडणूक घेणं गरजेचं असतं. त्यानुसार अंधेरी पूर्व पोटनिवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत मुख्य शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. भाजपने आपला अधिकृत उमेदवार जाहीर करण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. विशेष म्हणजे ठाकरे गटासाठी ही निवडणूक सर्वात महत्त्वाची होती.
पक्षफुटीनंतर शिवसेनेचा हा सर्वात मोठा विजय आहे. शिवसेनेला उभारी देणारा हा विजय आहे. या विजयामुळे राज्यातील पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटात नक्कीच चैतन्य संचारेल. दरम्यान, शिवसेनेचे बडे नेते अनिल परब यांनी ऋतुजा लटके यांना बहुमताने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत.