विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाची आघाडी, या दोन नेत्यांना उमेदवारी
vidhan parishad maharashtra election: विधान परिषदेसाठी शिक्षक मतदार संघातून ठाकरे सेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शिक्षकांचे प्रश्न आणि समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
लोकसभा निवडणूक संपताच राज्यात पुन्हा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २६ जून रोजी ही निवडणूक होणार आहे. राज्यातील दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक १० जून रोजी जाहीर झाली होती. परंतु त्याला शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर नवीन तारीख २६ जून रोजी करण्यात आली. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेना उबाठाकडून दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही निवडणूक शिवसेना शिंदे गटही लढवणार आहे.
कोण आहेत उमेदवार
महायुतीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अजून चर्चा सुरु झालेली नाही. या चार जागांवर निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि शिवसेना इच्छूक आहे. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून आघाडी घेत पदवीधर मतदार संघातून माजी मंत्री अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली. ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत.
भाजपकडून तयारी
मुंबई पदवीधर मतदारसंघावर पूर्वी भाजपचे वर्चस्व होते. परंतु शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी भाजपचे वर्चस्व मोडत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले. यामुळे गेल्या ३० वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मागील निवडणुकीत विलास पोतनीस यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली होती. ते निवडून आले होते. शिवसेनेतील बंडानंतर मुंबई पदवीधर मतदार संघावर शिंदे गटाचा दावा आहे. शिंदे गटाकडून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. परंतु भाजपही ही निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. भाजपकडून किरण शेलार यांची तयारी सुरु आहे. त्यासाठी शेलार यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी केली आहे.
कोण आहेत अभ्यंकर
विधान परिषदेसाठी शिक्षक मतदार संघातून ठाकरे सेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शिक्षकांचे प्रश्न आणि समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.