अनिल परब यांनी म्हाडाचे सीईओ यांना असं घेतलं फैलावर; नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला पाठवा, तोवर…
शिवसैनिकांना ताब्यात घेणं सोडा अन्यथा मुंबईतील शिवसैनिक येथे येतील, असा इशाराही परब यांनी दिला. म्हाडा अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाबतही नोटीस का पाठविली म्हणून अनिल परब प्रचंड संतापलेले होते.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी म्हाडाच्या सीईओ (CEO of MHADA) यांना फैलावर घेतलं. नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा, तोवर जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पाडलेल्या कार्यालयाशी माझा संबंध आहे का, असा सवालही अनिल परब यांनी विचारला. तासभर बसून म्हाडाच्या कार्यालयात अनिल परब यांनी चर्चा केली. तसेच अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अनिल परब यांचे कार्यकर्ते म्हाडाच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. शिवसैनिकांनी यावेळी घोषणाबाजी केली. म्हाडाच्या रहिवासी इमारतीमध्ये माझं कार्यालय होतं. मी त्या इमारतीचा रहिवासी होतो. सोसायटीच्या परवानगीनं मी माझं कार्यालयं तिथं उभारलं होतं. मात्र, किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली, असा आरोप अनिल परब यांनी केला.
म्हाडाचे सीईओ मिलिंद बोरीकर आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिक आणि अनिल परब हे म्हाडा अधिकाऱ्यांना झापत होते.
नोटीस कशी पाठविली?
अनिल परब यांनी आल्याआल्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की, माझा या कार्यालयाशी काही संबंध आहे का? अधिकाऱ्यांनी नाही म्हटलं. मग मला नोटीस कशी पाठविण्यात आली, असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला.
नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्यावर काही कारवाई करणार आहात का. त्यावर अधिकारी म्हणाले. तपासावं लागेल. त्यावेळी कोण होते. स्टेट मॅनेजर किती आहेत. तुमच्याकडं रेकॉर्ड नाही का, यावर अधिकाऱ्यांनी थोडा वेळ मागितला.
अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासाठी काम करतात का?
अनिल परब म्हणाले, तुम्ही रेकार्ड रेग्युलर करणार नव्हते. मग, हे कार्यालय लोकांनी तोडलं. अधिकारी आले नि त्याची पाहणी करून गेले. तरीही तुमच्या अधिकाऱ्यांनी नोटीस का काढली. तुमचे अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासाठी काम करतात का, असा सवालही अनिल परब यांनी केला.
जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांना इथं बोलवा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्याशिवाय इथून जाणार नसल्याचा इशाराचं त्यांनी दिला.
अन्यथा मुंबईतील शिवसैनिक येथे येतील
म्हाडाच्या परिसरात शिवसैनिक जमलेले होते. त्यांना पोलीस ताब्यात घेत असल्याची बातमी परब यांना मिळाली. परब यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. शिवसैनिकांना ताब्यात घेणं सोडा अन्यथा मुंबईतील शिवसैनिक येथे येतील, असा इशाराही परब यांनी दिला. म्हाडा अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाबतही नोटीस का पाठविली म्हणून अनिल परब प्रचंड संतापलेले होते.