छगन भुजबळ यांनी अमानुषपणे डोरिन फर्नांडिस यांचं घर हडपलं? अंजली दमानिया यांचा धक्कादायक आरोप
"मी भुजबळांची मुलाखत पाहिली. तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. जरांगे पाटलांवर टीका करताना भुजबळ म्हणाले, आम्ही आमच्या कष्टाचं खातो. हे ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली. हा माणूस असं बोलूच कसा शकतो? बोलण्याची एक स्टाईलही आहे त्यांची. कसले कष्टाचं खातं? भाजी विकणारा माणूस त्याच्या कष्टाने २ हजार ६५३ कोटी रुपये बनवू शकतो? फर्नांडिस सारख्या लोकांचे खाल्लेले लुबाडलेले पैसे आहेत हे", अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 2 जानेवारी 2024 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून एका कुटुंबाची कशी फसवणूक करण्यात आली, याबाबत सविस्तर माहिती सांगितली. दमानिया यांनी डोरिन फर्नांडिस केसबाबत सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम सांगितला. “सांताक्रुझ वेस्टला एसव्ही रोडला एक छोटा बंगला होता. तो फर्नांडिस कुटुंबाचा होता. या कुटुंबात एक भाऊ आणि दोन बहिणी आणि त्यांची मुलं असा परिवार होता. १९९३ला हे कुटुंब वाढल्यावर त्यांनी रिडेव्हल्पमेंटला देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रहेजा बिल्डरला पुनर्विकासाचं काम दिलं. त्या बदल्यात रहेजा बिल्डर्सकडून त्यांना पाच फ्लॅट बांधून मिळणार होते. १९९३ पासून २००३पर्यंत रहेजाने काही केलं नाही. २००३ ला रहेजाने हे काम परवेज कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं. ही परवेज कन्स्ट्रक्शन कंपनी ती समीर भुजबळांची होती. जेव्हा मी भुजबळांच्या विरुद्ध लढत असताना कोर्टात मला हे कुटुंब भेटलं. त्यांनी सर्व कहाणी सांगितली. रहेजाला हा बंगला पुनर्विकासाला दिला. रहेजाने तो भुजबळांना विकला आणि भुजबळांनी तिथे टोलेजंग इमारत उभी केली. नवव्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवला. या इमारतीला २०२२ पर्यंत ओसीही नव्हती”, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
“त्या कुटुंबाला ज्या दिवशी त्यांचा बंगला तोडला तेव्हा त्यांना कळलं हा तिसराच माणूस आहे. आपलं घर तिसऱ्या माणसाला विकल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे ते कुटुंब घाबरलं. त्यांनी भुजबळांना सांगितलं आम्हाला पाच फ्लॅट देण्याचं रहेजा बिल्डरसोबत ठरलं आहे. तुम्ही ते देणार का? मग हो नाही हो नाही करत पाच फ्लॅट देऊ म्हणून सांगितलं. त्यानंतर त्यांच्या अनेक मिटिंग झाल्या. त्यानंतर एमआयटीमधून समीर भुजबळांनी या फर्नांडिस कुटुंबाला अक्षरश: हाकलून लावलं. त्यांना फेकून दिलं होतं. पैसे देण्याचं सोडा. त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं”, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.
“एक सामान्य माणूस जे करतो ते सर्व या कुटुंबाने केलं. पोलिसात तक्रार दिली. गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. इकडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ होते. एफआयआर करूनही त्यावर कोणीच कारवाई केली नाही”, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
‘तिच्या अकाऊंटमध्ये फक्त ३८ हजार रुपये उरले’
“कोर्टात जाणं सर्वांनाच परवडणारं नव्हतं. वकिलाची फी सर्वांनाच परवडत नाही. क्लॉड फर्नांडिस गेल्यावर्षी वारले. तेव्हा ते ८७ वर्षाचे होते. ३० वर्षात त्यांची सेव्हिंग्ज संपली. दागिनेही संपले. डोरिन फर्नांडिसकडे काही उरलं नव्हतं. तिच्या गळ्यात जी माळ होती, तीही तिने विकली. आताच्या घडीला तिच्या अकाऊंटमध्ये फक्त ३८ हजार रुपये उरले आहेत. म्हणजे तिला पुढचे दोन महिने तिला चालले असते. ती बाई घरात स्वंयपाक करते, भांडी घासते, धुणं धुते, मुलांचे केस कापते सर्व काम ती ७८ वर्षाची बाई करते. कारण तिची तिन्ही मुले मेंटली रिटार्डेड आहेत. ज्याला ऑटेस्टिक म्हणतो, त्यातही मेंटल डिग्रेशन त्यांचं झालं. ते कंपलीट रिटार्डेशनपर्यंत गेले”, असं दमानिया यांनी सांगितलं.
“दोन मुलांना नोकरी मिळावी म्हणून तिने प्रयत्न केले. एकाला नोकरीला लावलं. त्याला ६०० रुपये पगार मिळत होता. दुसऱ्याला लावलं त्याला १००० रुपये पगार मिळत होता. ती एकदा सहज बघायला गेली तेव्हा तिच्या मुलांकडून हमाली करून घेत असल्याचं तिने पाहिलं. अशी बाई काय करणार. जिचा नवरा गेला, मुलं अशी. पैसेही संपले. अशावेळी ती काय करणार?”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
‘इतके ते क्रूर झाले आहेत की…;
“माझी आणि तिच्या नवऱ्यासोबतची बैठक कोर्टात झाली. भुजबळांना वाईट वाटायचं सोडून… उद्या दाऊदला सांगितलं असतं हे कुटुंब असं आहे तर त्याने एक दिवसही पैसे ठेवले नसते. ताबडतोब त्या माणसानेही पैसे दिले असते. पण हे त्यापलिकडे गेलेले राजकारणी आहेत. त्यांना हृदय म्हणा, इतके ते क्रूर झाले आहेत की त्यांच्या हृदयाला पाझर फुटत नाही. समीर भुजबळांची शेवटची मुलाखत ऐकली त्यात ते १६ वेळा एकच गोष्ट म्हटले. त्या माणसाला आम्ही पैसे देऊ केले होते, असं समीर भुजबळ म्हणाले. किती पैसे तर फक्त ५० लाख रुपये. सांताक्रुझच्या त्या इमारतीचे फक्त ५० लाख रुपये देऊ केले होते. आम्ही सहानुभूती म्हणून देत होतो असं सांगत होते. कसली सहानुभूती? ते त्यांचं घर आहे. त्यांची जमीन आहे”, असं दमानिया म्हणाल्या.
“तुम्ही तुमची इमारत बांधली. त्याच्या पहिल्या तीन मजल्यावर जे पाच फ्लॅट आहेत ते तुम्ही त्यांना द्यायचे होते. कधी दिलेत. आणि कसली दगडाची सहानुभूती दाखवत होता. एकदा नव्हे १६ वेळा पत्रकार परिषदेत सहानुभूती दाखवत होतो असं म्हणत होते. अशा लोकांना काय म्हणावं? माझ्याकडे तर शब्दच नाहीत”, असंही त्या म्हणाल्या.
‘भाजी विकणारा माणूस कष्टाने २ हजार ६५३ कोटी रुपये बनवू शकतो?’
“मी भुजबळांची मुलाखत पाहिली. तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. जरांगे पाटलांवर टीका करताना भुजबळ म्हणाले, आम्ही आमच्या कष्टाचं खातो. हे ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली. हा माणूस असं बोलूच कसा शकतो? बोलण्याची एक स्टाईलही आहे त्यांची. कसले कष्टाचं खातं? भाजी विकणारा माणूस त्याच्या कष्टाने २ हजार ६५३ कोटी रुपये बनवू शकतो? फर्नांडिस सारख्या लोकांचे खाल्लेले लुबाडलेले पैसे आहेत हे”, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
“फर्नांडिस कुटुंबासोबत न्याय थोडा झाला. खूपसा झाला असं वाटत नाही. त्यांना जे पाच फ्लॅट मिळणार होते. त्यात एक भाऊ आणि दोन बहिणी मिळून एक फ्लॅट होता. त्यात यांचा जो शेअर होता. त्यातील दोन फ्लॅट आणि एका बहिणीने तिचा फ्लॅट यांच्या नावावर केला होता. म्हणून क्लॉडला तीन फ्लॅट मिळणार होते. कारण क्लॉडची मुले ऑटिस्टिक होती. आधी ते ७२० स्क्वेअर फूटचे मिळणार होते. यांनी एक न सही करता एक करार केला होता. त्यात ७२० स्क्वेअर फूटही कमी केले. टोटल जे केले ते १५०० स्क्वेअर फूट केले. आणि १५०० स्क्वेअर फूट प्रमाणे ही रक्कम येते. मी २०२२ पासून यात लक्ष घातलं”, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.