कोणीही चालेल पण सत्ताच हवी, हा तर भाजपचा सत्ता जिहाद; उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने देशाची विल्हेवाट लावली. हिंदूंमध्ये भेदभाव करत आहेत. मराठी माणसांमध्ये जातीवरुन भांडण लावत आहेत. हिंमत असेल तर आरक्षण देऊन दाखवायला पाहिजे होते. आजपर्यंत का केले नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
शिवतिर्थावर दसरा मेळाव्यात बोलतान उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘दहा बारा दिवसांपूर्वी मी नागपूरला गेलो होतो. मी शहरीबाबू आहे. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त केलं. माझं कर्तव्य म्हणून केलं. दहा रुपयात पोळी भाजी दिली कर्तव्य म्हणून दिली. मी कोरोनात काम केलं. ते कर्तव्य म्हणून केलं. मी नागपूरला गेलो. लोकांनी व्यथा सांगितल्या. सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही. अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाया आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद.’
‘एक दोन महिने थांबा. आमचं सरकार येतंय. ही तुमची मस्ती ११ दिवसात १६०० शासन निर्णय जारी. यातील अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. जे निर्णय राज्याच्या मुळावर येणार आहे, बिल्डरच्या झोळ्या भरणारे आहेत ते रद्द करूच पण अधिकाऱ्यांना सांगतो या पापात सहभागी होऊ नका. नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकू.’
‘मुंबई पालिकेची एफडी तोडली. फक्त ४० हजार कोटी राहिले. ते पगारासाठी ठेवावे लागतात, तोडावी लागत नाही म्हणून ठेवली. ९० हजार कोटी उडवून टाकली. पावणे तीन कोटीची वर्क ऑर्डर यांनी काढली,. कोणती कामे. कुणाला दिली. रस्त्यात कुणी खडी टाकली याचीही चौकशी केली. तीन लाख कोटी कुणाला दिले. कोणत्या कंत्राटदाराला दिले त्याची यादी हवी.’
‘तीन लाख कोटी तुम्ही राज्याचे उधळून टाकली. राज्य सरकारनेही कर्ज घेण्याची मुदत त्यांनी आज वापरली आहे. डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत आज वापरली आहे. तुम्ही कर्ज काढून दिवाळी साजरी करत आहात.’ असं ही उद्धव ठाकरे म्हणाले.